
ढाणकी प्रतिनिधी : प्रवीण जोशी
खरीप हंगाम अंतिम आला तरी निसर्गाची अवकृपा कायमच राहिलेली आहे, हंगामातील मुख्य पीक असलेल्या सोयाबीनचे नुकसान अतिवृष्टीने झाले तर सध्याच्या प्रतिकूल वातावरणाचा परिणाम तुर पिकावर झाला आहे, ऐन शेंगा भरण्याच्या अवस्थेत तूर असतानाच मर रोगाचा प्रादुर्भाव वाढत आहे, त्यामुळे तुरीचे पीक बुडापासूनच सुकू लागले आहे, त्यामुळे तूर उत्पादकांच्या हाती तुराट्याच शिल्लक राहतील अशे चित्र उमरखेड तालुक्यातील ढाणकी बाजार सह आजूबाजूच्या परिसरात दिसून येत आहे, उत्पादनात तर घट झालीच आहे पण खराटा झालेल्या झाडांच्या शेंगा पासून हाती काय येणार? असा प्रश्न शेतकऱ्यांना पडला आहे, वातावरणातील बदलाचा परिणाम हा खरीप हंगामातील सर्वच पिकावर झाला आहे, मध्यंतरी अतिवृष्टीने कापूस आणि तुरीची सुटका झाली होती, पण आता ढगाळ वातावरणाचा परिणाम या पिकावर झालेला आहे, मर रोगामुळे तूर बुडापासूनच सुकत आहे, गतवर्षीप्रमाणे यंदाही पिकावर या रोगांचा प्रादुर्भाव वाढला आहे, अधिकच्या खर्चामुळे याचे नियंत्रण तरी करावे कसे? असा सवाल शेतकऱ्यांसमोर आहे, शेंगा भरण्याआधीच झाडच सुकत आहे त्यामुळे दाण्यांचा आकार लहान झाला असून त्याचा उत्पादनावर मोठा ठपका होणार आहे, पाने,शेंगा वाळून गेल्याने आता केवळ तुराट्याच उभ्या दिसत आहे,
‘ तुर पिकावरील भिस्तही मावळली’
खरीप हंगामात तूर हे आंतरपीक म्हणून घेतले जातं असले तरी उत्पादनाच्या दृष्टीने महत्त्वाचे पीक आहे, शिवाय हंगामातील सर्वात शेवटचे पीक आहे, आता कापूस अंतिम टप्प्यात असला तरी मात्र, तूर हे शेंग भरण्याच्या अवस्थेत आहे मात्र परतीच्या पावसानंतर निर्माण झालेल्या वातावरणाने या पिकावर किडीचा आणि रोगराईचा प्रादुर्भाव वाढत आहे, त्यामुळे तुरीचे पीक संपूर्ण वाळून गेले असून उभ्या पिकांचा खराटा झाला आहे., आता काढणी कामेही मुश्किल होत आहे, आतापर्यंत पीक जोपासण्यासाठी झालेला खर्च तरी उत्पादनातून निघणार की नाही? असा प्रश्न आहे, अखेर खरिपातील तुर पिकावर भिस्त असताना ती आशाही आता मावळली,
वातावरणातील बदलाचा परिणाम
मर रोग हा बुरशीजन्य रोग आहे, यामुळे तुरीच्या खोडावर ठिपके, भेगा पडून झाडाच्या मुळाकडे अन्नद्रव्याचा पुरवठा होऊ दिला जात नाही, त्यामुळे तुर मुळापासूनच वाळायला सुरुवात होते, दरवर्षी अंतिम टप्प्यात पीक असताना मर रोगाचा प्रादुर्भाव हा ठरलेलाच आहे, त्यामुळे वर्षभर केलेली मेहनतही वाया जाते आणि अपेक्षित उत्पादनही मिळत नाही, वातावरणातील बदलाचा हा परिणाम आहे असे जाणकार सांगतात,
