युवा पत्रकार जय राठोड यांना ‘राष्ट्रीय जनसेवा पत्रकारिता पुरस्कार’ प्रदान,पत्रकारिता क्षेत्रातील कार्याची आजवरची सर्वोच्च दखल

राळेगाव तालुका प्रतिनिधी रामभाऊ भोयर

युवा पत्रकार तथा कवी, लेखक, गझलकार जय प्रकाश राठोड यांना लोकनिर्माण ग्रामीण विकास व संशोधन संस्था, महाराष्ट्र या नामांकित संस्थेच्या वतीने संभाजीनगर (औरंगाबाद) येथे पत्रकारिता क्षेत्रातील कार्याची दखल घेत त्यांना ‘राष्ट्रीय जनसेवा पत्रकारिता पुरस्कार’ प्रदान करून यथेच्छ सन्मान करण्यात आला. विशेष म्हणजे देशभरातील काही निवडक मान्यवरांना या पुरस्काराने गौरविण्यात आले. सन्मानचिन्ह, प्रमाणपत्र, मानाचा भगवा फेटा आणि पुष्पगुच्छ देऊन मान्यवरांच्या हस्ते त्यांना पुरस्कार बहाल करण्यात आला. सन २०१४ पासून जय राठोड हा युवक पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहे. एका साप्ताहिक वृत्तपत्रातून त्यांनी आपल्या कार्याला सुरुवात केली. अनेक दैनिक वृत्तपत्रात त्यांनी आजवर कार्य केले असून साजेसे लिखाण देखील केले आहे. अंधारात चाचपडणाऱ्या लोकांना प्रकाशझोतात आणणारे पत्रकार म्हणून जय राठोड यांची ओळख आहे. शिवाय सकारात्मक पत्रकारितेचे ते ज्वलंत उदाहरण आहेत. प्रेस संपादक व पत्रकार सेवा संघाचे यवतमाळ युवा जिल्हा कार्याध्यक्ष आणि दिग्रस तालुका पत्रकार संघटनेचे उपाध्यक्षपदाची धुरा ते हल्ली सांभाळत असून साऊथ एशियन रिपोर्टर्स असोसिएशन या आंतरराष्ट्रीय पत्रकार संघटनेचे महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष हे पद देखील त्यांनी भूषविले आहे. यावेळी हिंदू धर्मगुरू दशनाम गोस्वामी आखाड्याचे राष्ट्रीय अध्यक्ष डॉ. कृष्णदेव गिरी,सुप्रसिद्ध पत्रकार डॉ. सुरेश राठोड, लोकनिर्माण ग्रामीण विकास व संशोधन संस्थेच्या अध्यक्षा डॉ. अर्चना मेडेवार, लोकतांत्रिक लोकराज्यम पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित कुमार चौधरी, क्राईम स्प्रेक्टम रिसर्च फाउंडेशन, दिल्लीच्या जया गांधी, राष्ट्रीय पर्यावरण मंचचे राष्ट्रीय अध्यक्ष कमलेश सिंग, यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते. यावेळी हरियाणा, उत्तरप्रदेश, दिल्ली, उत्तराखंड, मध्यप्रदेश, बिहार, तामिळनाडू, महाराष्ट्र यांसह देशभरातून आलेले मान्यवर उपस्थित होते. सूत्रसंचालन साक्षी गिरी व अंजली मॅडम यांनी तर आभार डॉ. अर्चना मेडेवार यांनी मानले. राष्ट्रगीताने कार्यक्रमाची सांगता झाली.