
प्रतिनिधी,प्रवीण जोशी
ढाणकी : केंद्र सरकारच्या ‘पीएम विश्वकर्मा’ योजनेअंतर्गत राज्यातील २२ प्रकारच्या पारंपारिक कारागिरांना आता बॅंकेतून अर्थसहाय्य मिळणार आहे. तीन लाखांपर्यंत कमी व्याजदराने मिळणाऱ्या कर्जाला कोणत्याही प्रकारची बॅंक गॅरंटी लागत नाही, हे योजनेचे वैशिष्ट्य आहे. आता योजना तातडीने सुरू करण्यासाठी जिल्हा उद्योग केंद्राच्या माध्यमातून कौशल्य प्रशिक्षण केंद्रे सुरु करण्याच्या हालचाली युद्धपातळीवर सुरु आहेत. देशातील सुतार, कुंभार, धोबी, मूर्तिकार, शिल्पकार यासह अनेक कारागिरांना केंद्र सरकारने मोठा दिलासा दिला आहे. देशातील ३० लाख कारागिरांचे नशीब पीएम विश्वकर्मा योजनेमुळे बदलेल. केंद्रीय मंत्रिमंडळाने नवीन विश्वकर्मा योजनेला मंजुरी दिली आहे. १३ हजार कोटी रुपयांच्या या योजनेचा फायदा देशातील ३० लाख पारंपरिक कारागिरांना एक लाख रुपयांपर्यंतचे कर्ज दिले जाणार आहे. त्यावरील कमाल व्याज पाच टक्के असेल. एक लाखाच्या मदतीनंतर पुढील टप्प्यात दोन लाखांपर्यंतचे कर्ज उपलब्ध केले जाणार आहे. ही योजना १३ हजार कोटी रुपयांची आहे. लहान शहरांमध्ये गुरू – शिष्य परंपरेनुसार कौशल्यासंबंधीच्या कामात विविध वर्ग गुंतले आहेत. यात सुतार, लोहार, कुंभार, गवंडी, धोबी, फुलकाम करणारे, मासे पकडायचे जाळे विणणारे, कुलपे तयार करणारे, शिल्पकार आदींचा समावेश होतो. या योजनेद्वारे त्यांना पतपुरवठ्याची सुविधा आणि बाजारपेठ उपलब्ध करून देण्याकरिता मदत केली जाणार आहे. दृष्टिक्षेपात विश्वकर्मा योजना – पीएम विश्वकर्मा योजनेच्या पहिल्या टप्प्यात १८ पारंपरिक उद्योगांचा समावेश – पारंपरिक कारागीर आणि कारागिरांच्या ३० लाख कुटुंबास याचा फायदा होणार आहे. या योजनेंतर्गत मूलभूत आणि
आधुनिक असे दोन प्रकारचे कौशल्य प्रशिक्षण देणार असुन आधुनिक साधने खरेदी करण्यासाठी सरकार १५ हजार रुपयांची मदत करणार आहे. ब्रॅंडिंग, ऑनलाइन मार्केट अॅक्सेस यासारखी मदत केंद्राकडून दिली जाणार आहे. प्रशिक्षणादरम्यान दररोज ५०० रुपये मानधनही दिले जाणार आहे. किमान प्रशिक्षण सहा ते पंधरा दिवस असणार आहे. १७ सप्टेंबरला विश्वकर्मा जयंतीनिमित्त ‘विश्वकर्मा योजना’ सुरू करण्यात आली आहे. विश्वकर्मा योजनेचा उद्देश कौशल्य प्रशिक्षण, तंत्रज्ञान आणि आर्थिक सहाय्य देऊन देशभरातील कारागीर व कारागिरांच्या क्षमता वाढविणे हा आहे. या योजनेंतर्गत कुशल कारागिरांना एमएसएमई म्हणजेच सूक्ष्म, लघू आणि मध्यम उद्योगांशी जोडले जाणार आहे. त्यामुळे त्यांना खात्रीची आणि मोठी बाजारपेठ मिळू शकेल.”विश्वकर्मा योजनेच्या माध्यमातून ग्रामीण भागातील बारा बुलतेदारांचा आर्थिक विकास होईल. सदर योजनेकरीता आपले सरकार सेवा केंद्रावर अथवा स्वत: नोंदनी करता येईल. आपले सरकार सेवा केंद्रावर कोणतीही फी आकारली जाणार नाही.
चौकट…
पी.एम. विश्वकर्मा योजनेची पात्रता
● ग्रामीण किंवा शहरी पारंपारिक कारागिर
● वय १८ वर्ष पुर्ण झालेले असावे.
● मागील पाच वर्षात कोणत्याही शासकीय अनुदान योजनेचा लाभ घेतलेला नसावा.
● एका कुटुंबातील एकच व्यक्ती सदर योजनेचा लाभ घेऊ शकतो.
● कुटुंबात कोणी शासकीय नोकरीत नसावा.
…चौकट…
पी.एम. विश्वकर्मा योजनेकरीता लागनारी आवश्यक कागदपत्रे
● आधार कार्ड
● मोबाईल नंबर आधार कार्डशी लिंक असावा.
● बॅंक खात्याशी आधार लिंक असावे.
● राशन कार्ड नसेल तर सर्व कुटुंबाचे आधार कार्ड चालेल.
● पारंपारिक कारागिर असलेबाबत ग्राम पंचायत सरपंचाचा दाखला.
…चौकट…
योजनेबद्दल ठळक बाबी
● ‘स्किल इंडिया’ पोर्टलवर नोंदणी केल्यानंतर ओळखपत्र मिळणार.
● त्यानंतर प्रशिक्षण योजनेतील लाभार्थी कारागिरांना पाच दिवसांचे प्रशिक्षण बंधनकारक.
● प्रशिक्षण कालावधीत दररोज ५०० रुपयांप्रमाणे स्टायफंड तथा शिष्यवृत्ती मिळणार.
● प्रशिक्षण पूर्ण झाल्यावर १५ हजार रुपये किंवा साहित्य किट मिळेल व त्यानंतर प्रमाणपत्र मिळणार.
● प्रमाणपत्र जोडून बॅंकेकडे योजनेअंतर्गत करावी कर्जाची मागणी, सुरवातीला मिळणार बिनव्याजी एक लाख रुपये बिनव्याजी कर्जाची वेळेत परतफेड केल्यास मिळणार पुढील दोन लाखांचे कर्ज मिळणार.
