
पोंभूर्णा :- ग्रामीण रुग्णालय पोंभूर्णा येथे भरती केलेल्या दोन वर्षीय चिमुकल्याचा उपचार न झाल्याने व ॲम्ब्युलन्स उशीरा मिळाल्याने व ॲम्ब्युलन्समध्ये ऑक्सिजन न मिळाल्याने त्या चिमुकल्याचा वाटेतच मृत्यू झाल्याची घटना पोंभूर्णा येथे घडली.मानव संजूसिंह बघेल असे मृत झालेल्या चिमुकल्याचे नाव आहे.
पोंभूर्णा येथे पाणीपुरीचा व्यवसाय करणारे संजु सिंह बघेल भेलपुरी
विकुन आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करतात.त्यांच्या दोन वर्षांच्या मुलाची प्रकृती अचानक बिघडल्याने त्याला ग्रामीण रुग्णालय पोंभूर्णा येथे भरती करण्यात आले. प्रकृती गंभीर होत असल्याचे लक्षात येताच डाॅक्टरनी त्यांना चंद्रपूरला रेफर दिले.
संबंधितांनी १०८ ला फोन केला पण फोन करुनही रुग्णवाहिका तब्बल तीन तास उशिरा आली.तोपर्यंत मुलाची प्रकृती पुन्हा बिघडली व त्याला श्वास घेण्यास त्रास होऊ लागला मात्र रुग्णवाहिकेमध्ये डॉक्टर नसल्याने व आक्सिजन न लावल्याने त्या चिमुकल्याचा वाटेतच दुर्दैवी मृत्यू झाला. पोंभूर्णा शहरातील या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त केल्या जात आहे. रुग्णाच्या सेवेसाठी असलेली १०८ ची ॲम्ब्युलन्स हि तीन तास उशीरा आली.ॲम्बुलन्समध्ये डॉक्टर नसल्याने व वेळेवर ऑक्सिजन न मिळाल्याने मानवचा मृत्यू होणे हि दुर्दैवी व गंभीर घटना आहे.संबंधीत वैद्यकीय अधिकारी,वैद्यकीय अधीक्षक व बिविजी कंपनी यांचेवर चौकशी करून कार्यवाही करण्यात यावी अशी मागणी भरतीय बौध्द महासभेचे अध्यक्ष अविनाश वाळके यांनी केली आहे.
…………………………………….
मुलाला ग्रामीण रुग्णालयात आणले होते तेव्हा त्याची प्रकृती गंभीर होती. डॉक्टरांनी मुलाची तपासणी उपचार केला होता मात्र प्रकृती गंभीर होत असल्याने त्याला चंद्रपूरला रेफर करण्यात आले.ॲम्बुलन्स पोंभूर्ण्यात हजर नसल्याने ती बाहेरून येत पर्यंत उशीर झाला. यात डॉक्टराकडून कोणताही निष्काळजीपणा करण्यात आला नाही. पालकांच्या निष्काळजीपणामुळेच मुलाचा मृत्यू झाला.
-डाॅ.संदेश मामीडवार,
वैद्यकीय अधीक्षक,
ग्रामीण रुग्णालय पोंभूर्णा
