
वर्धा:- राज्यातील कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन योजना सुरू व्हावी यासाठी युवा सामाजिक कार्यकर्ते तथा संभाजी ब्रिगेडचे पियूष रेवतकर यांनी जुन्या पेन्शनची प्रतिकात्मक गुढी उभारली.दरम्यान दिलेला शब्द पाळून शासनाने जुनी पेन्शन योजना सुरू करावी हे लक्ष वेधण्यासाठी उभारलेल्या या गुढीचे कर्मचारी वर्गात कौतुक होत आहे.राज्यातील शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी व सर्व विभागातील कर्मचारी यांनी नुकताच सात दिवसाचा संप पुकारलेला होता.दरम्यान जुनी पेन्शन बाबत महाराष्ट्र शासनाच्या लेखी आश्वासनानुसार संप मागे घेण्यात आला.तीन महिन्यात समितीचा अहवाल आल्यानंतर जुनी पेन्शन योजना लागू करू असे शासनामार्फत आश्वासित करण्यात आले व कर्मचारी आपल्या कामावर रुजू झाले.मराठी नववर्षाला महत्त्व असल्याने आपल्या मागणीकडे महाराष्ट्र शासनाचे लक्ष केंद्रित करण्यासाठी युवा सामाजिक कार्यकर्ते पियूष रेवतकर यांनी मराठी नववर्षाला त्यांच्या घरी चक्क जुनी पेन्शनची गुढी उभारली.यावेळी जुनी पेन्शनच्या गुढीचे पूजन करून शासनाने दिलेले आश्वासन पूर्ण करून लवकरात लवकर कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन योजना लागू होवो ही प्रार्थना करण्यात आली.या लक्षवेधी गुढीचे राज्यातील कर्मचारी वर्गात कौतुक होत असून शासनाने दिलेला शब्द पाळावा अशी मागणी कर्मचारी वर्गातून होत आहे.
