बेंबळा कालव्याच्या नियोजन शून्य खोदकामामुळे शेतकऱ्याच्या शेतात पाणी
(कोच्ची गट क्रमांक ५५/१, ५५/२, ५५/३ चे शेतात पाणी, शेतकऱ्यांनी केली नुकसान भरपाईची मागणी)

सहसंपादक: रामभाऊ भोयर

शेतकऱ्याच्या शेतीमध्ये उत्पन्नात वाढ होऊन शेतकरी सुख समृद्ध व्हावा या उदात्त हेतूने शेतकऱ्यांना सिंचनासाठी मुबलक पाणी मिळावे म्हणून शासनाने बेंबळा प्रकल्पाचे माध्यमातून राळेगाव तालुक्यात व इतरही तालुक्यात मध्यम प्रकल्पासोबत लघु प्रकल्पाची निर्मिती करून कालवे खोदले. परंतु या खोदलेल्या कालव्यांचे नियोजन व्यवस्थित होत नसल्यामुळे या कालव्यामुळेच शेतात पाणी साचून अनेक शेतजमिनीवरील पिके नेस्तनाबूत होत आहे. मात्र या बाबीकडे बेंबळा प्रकल्प व्यवस्थापन विभागाचे सपेशल दुर्लक्ष होत असल्याचे वास्तव आहे.
शेतकऱ्यांच्या शेतात पाणी पोहोचून सिंचन व्हावे म्हणून बेंबळा प्रकल्पाचे लहान-मोठे कालवे खैरी परिसरातील अनेक शेतातून खोदण्यात आले. मात्र कालवा खोदकाम करताना शेतकऱ्यांच्या ज्या शेतात कालवा खोदला आहे त्या शेताचा कसलाही विचार न करता कालव्याचे खोदकाम केले आहे. कोच्ची येथील शंकरराव ठाकरे , वसंत ठाकरे व सुभाष ठाकरे यांचे शेत गट क्र. ५५/१, ५५/२ ,५५/३ या शेतामध्ये आता सध्या सुरू असलेल्या पावसाने बेंबळा विभागाच्या झालेल्या कालव्याचे जे बांध टाकण्यात आले त्यामुळे त्यांच्या शेतातून पावसात निघणाऱ्या पाण्याचा मार्ग बंद झाला त्यामुळे त्यांच्या शेतात पाणी साचून उभे पिक नष्ट होण्याच्या मार्गावर आहे. नष्ट होणाऱ्या पिकाचा लावणीपासून ते खत देण्यापर्यंत चा सर्व खर्च शासनाने किंवा बेंबळा प्रशासनाने द्यावा याची रीतसर तक्रार सदरहू शेतकऱ्यांनी यवतमाळ बेंबळा विभागाकडे केली आहे .
बेंबळा कालव्यांचे बऱ्याच ठिकाणी नियोजन शून्य काम झाले असून मात्र या बाबीकडे बेंबळा प्रकल्प विभागाकडून जाणीवपूर्वक दुर्लक्ष होत आहे. नुकसानग्रस्त शेतकऱ्यांनी नुकसानी बाबतची तक्रार केल्यास संबंधित विभाग तक्रारीची कोणतीही दखल घेत नाही व शेतकऱ्यांनी स्वतःहून नुकसान होऊ नये म्हणून काही उपाययोजना केल्यास संबंधित विभागाकडून कार्यवाहीची भीती दाखवली जात आहे. त्यामुळे परिसरातील शेतकरी बेंबळा कालव्यांच्या नियोजन शून्य कामाच्या समस्येमुळे त्रस्त असून या कालव्यांमुळे शेतकऱ्यांची डोकेदुखी वाढली आहे. तरी बेंबळा प्रकल्प विभागाने त्यांच्या नियोजन शून्य कामामुळे ज्या शेतकऱ्यांच्या शेतात पाणी साचले त्याची योग्य विल्हेवाट लावावी व संभाव्य होणारे शेतकऱ्याचे नुकसान टाळावे अशी परिसरातील शेतकऱ्यांकडून मागणी होत आहे.

प्रतिक्रिया:
सदरहू शेतकऱ्यांच्या तक्रारीबाबत बेंबळा विभागाचे अभियंता शिंदे यांच्याशी संपर्क साधला असता सदर शेतकऱ्याची तक्रार आम्हाला प्राप्त झाला आहे. त्या अनुषंगाने आम्ही प्रत्यक्ष पाहणी करून नियोजन करण्यात येईल व शेतकऱ्याची समस्या सोडविण्याचा प्रयत्न करू असे सांगितले.


बेंबळा प्रकल्प विभाग अभियंता शिंदे