

आज दि १८ जुलै २०२३ रोज मंगळवारला पं. स. सभागृहात दुपारी १२- ०० वाजता मा. संदीप गोडशलवार , संवर्ग विकास अधिकारी पं. स. वरोरा यांनी वरोरा तालुक्यातील सर्व शिक्षण विस्तार अधिकारी , सर्व केंद्रप्रमुख , सर्व मुख्याध्यापक तथा सर्व बी आर सी कर्मचारी यांची आपल्या कार्यक्षेत्रातील विविध शैक्षणीक बाबींवर विचार करण्यासाठी सभेचे आयोजन केले होते . या सभेत पं. स. वरोरा चे गटशिक्षणाधिकारी ज्ञानेश्वर चहारे , शि. वि. अ. नामदेव राऊत सर हे सुद्धा उपस्थित होते .
सभेला मार्गदर्शन करतांना संदीप गोडशलवार म्हणाले की जि. प. विद्यार्थ्यांच्या इंग्रजीवर विशेष काम होणे गरजेचे आहे . जि. प. शिक्षकांनी मनात आणले तर निश्चितच स्पोकन इंग्रजी संदर्भात चांगले काम करता येऊ शकते . यावेळी त्यांच्या हस्ते जि. प. साखरा शाळेचे विषय शिक्षक गोपाळ गुडधे सरांचा दि. २ मे ते २६ जून २०२३ या संपूर्ण उन्हाळी सुट्टीच्या कालावधीत इंग्रजी प्रशिक्षण वर्ग राबविल्याबद्दल शाल श्रीफळ व सन्मान चिन्ह देऊन सन्मान करण्यात आला . गुडधे सरांच्या गो विथ स्ट्रकचर या ग्रामिण भागातील मुलांसाठी गेल्या काही वर्षांपासून सुरु असलेल्या स्पोकन इंग्रजी उपक्रमाची मदत घेऊन त्याच धर्तीवर संपूर्ण तालुक्यात सर्व शाळांमध्ये स्पोकन इंग्रजी वर्ग राबविण्यात यावे असे त्यांनी सर्व मुख्याध्यापकांना सांगितले . यावर्षी पासूनच चंद्रपूर जि. प. देखिल स्पोकन इंग्रजीवर काम सुरु करणार असल्याचे सांगत त्या अगोदरच आपल्या तालुक्यात हे वर्ग सुरु करत असल्याची त्यांनी घोषणा केली आणि वरोरा तालुका जि. प. शाळांमध्ये स्पोकन इंग्रजी उपक्रम सुरु करणारा महाराष्ट्रातील पहिला तालुका ठरला .
ज्ञानेश्वर चहारे यांनी इंग्रजी हा विषय महत्वाचा असल्यामुळे हा उपक्रम सर्व शाळांना बंधनकारक न ठेवता सर्वच शाळांनी स्पोकन इंग्रजी वर्ग सुरु करण्याचा प्रयत्न करावा व जि. प. च्या विद्यार्थ्यांचा इंग्रजी भाषेतील आत्मविश्वास वाढविण्यासाठी प्रयत्न व्हावा ही अपेक्षा व्यक्त केली . नामदेव राऊत सरांनी नवभारत साक्षरता अभियान , सेतू अभ्यास २०२३-२४ , विविध शिष्यवृत्ती योजना , अध्ययन स्तर , समावेशित शिक्षण यावर मार्गदर्शन केले . यावेळी सर्व शाळांमध्ये स्पोकन इंग्रजी वर्ग कसे सुरु करता येईल या संदर्भात गुडधे सरांनी सविस्तर मार्गदर्शन केले .
सभेत वरोरा पं. स. अंतर्गत सर्व शिक्षण विस्तार अधिकारी , सर्व केंद्रप्रमुख , सर्व मुख्याध्यापक तथा सर्व विषय शिक्षक बी. आर. सी. उपस्थित होते . सभेचे सूत्र संचलन बाळू जीवने यांनी तर उपस्थितांचे आभार नामदेव राऊत सरांनी मानले .
