
सहसंपादक : रामभाऊ भोयर
मणिपूर घटनेने जगात संपूर्ण देशाची मान शरमेने खाली गेली, पण केंद्र व राज्य सरकार अजूनही बेफिकीर आहे, असे प्रतिपादन माजी मंत्री अँड. शिवाजीराव मोघे, राष्ट्रीय अध्यक्ष, अखिल भारतीय आदिवासी काँग्रेस यांनी केले. ते यवतमाळ येथे आयोजित पत्रकार परिषदेत बोलत होते.
मणिपूर राज्यात तीन महिलांची विवस्त्र करून त्यांची धिंड काढण्याचा माणुसकीला काळिमा लावण्याचा प्रकार घडला. त्यामुळे जगात संपूर्ण देशाची मान शरमेने खाली गेली. असे असताना केंद्र सरकार असो की मणिपूर येथील भाजप सरकार असो या प्रकरणाकडे साधा गुन्हा घडल्यासारखे पाहत आहे हे अत्यंत संतापजनक आहे. 4 मे रोजी ही घटना कंगपोकपी जिल्ह्यातील बी फिनीम गावात घडली पण त्याचा व्हिडीओ तब्बल अडीच महिन्यानंतर आल्यावर तेथील सरकारला माहिती झाली. याचा अर्थ कोणत्याही प्रकारची सुरक्षा त्याठिकाणी नाही हे दिसत आहे. पोलिसांच्या एफआयआर प्रमाणे मैतई संघटनांचे हजार च्या दरम्यान असलेल्या सशस्त्र हल्लेखोरांनी गावात घुसून कुकीची वस्ती असलेल्रा घरांना आगी लावल्या. त्यामुळे गावकरी घाबरून जंगलात पळाले. मात्र तीन महिला त्यांच्या तावडीत सापडल्या. जमावाने त्यांना विवस्त्र केले. 21 वर्षाच्या मुलीवर सर्वांच्या समोर सामूहिक बलात्कार केला तेव्हा तिचा भाऊ धावून आला असता जमावाने त्याची हत्या केली. जमावाचे समाधान झाले नाही, त्यांनी सर्व घटनेची व्हिडीओही चित्रित केला. त्यानंतर गावकऱ्याच्या मदतीने दोन महिला पळून गेल्या. ही अत्यंत वेदना दायक घटना आहे. त्या कोणत्या जातीच्या समाजाच्या होत्या त्यापेक्षा त्या महिला होत्या हे महत्वाचे आहे. एकीकडे देशाच्या सर्वोच्य पदावर दुर्लक्षित घटकातील आदिवासी महिलेला बसविले म्हणून स्वतःची पाठ थोपटून घेत आहे. केंद्रात व राज्यात त्यांच्याच पक्षाचे सरकार आहे, हे अत्यंत निंदनीय आहे. मणिपूरचे मुख्यमंत्री एन बिरेंद्रसिंह यांनी घटनेनंतर पोलिसांना गुन्हेगारांचा शोध घेण्याचे आदेश दिले पण अद्याप आरोपी मोकळे आहे. या घटनेने देशात संतापाची लाट आली आहे इतकच नव्हे सरकार काहीच करीत नसल्याने सर्वोच्य न्यायालयाने सरकारला खडे बोल सुनावले आहे. तुम्ही काही कारवाई करणार नसाल तर आम्ही करू अशा शब्दात सरन्यायाधीश श्रीमान धनंजय चंद्रचूड यांनी सरकारला सुनावले आहे. हि दोन्ही सरकारसाठी अत्यंत लाजिरवाणी बाब आहे. गेल्या तीन महिन्यापासून मणीपूर होरपळत आहे मात्र दोन्ही गटांना एकत्र आणून तोडगा काढण्याचा प्रयत्न सरकारकडून झाला नाही व मणिपूर जळत असताना पंतप्रधान मात्र मौन बाळगून होते. यासर्वांची फार मोठी किमत संपूर्ण देशाला भोगावी लागत असल्याचे माजी मंत्री अँड.शिवाजीराव मोघे म्हणाले पत्रकार परिषदेला माजी मंत्री वसंतराव पुरके, बाळासाहेब मोघे,सुरेश चिंचोळकर, राजु चांदेकर,धर्मराज चांदेकर ,अशोक गेडाम,विलास गेडाम उपस्थित होते.
जगण्याचा अधिकार हिरावला
शेतकऱ्यांच्या आत्महत्या, बेरोजगारी, महागाई प्रचंड वाढली असताना देशाचे पंतप्रधान काहीच बोलायला तयार नाही. सरकारी संस्था विक्री केल्या जात आहे. आता आयडीबीआय बँक सुद्धा विकायला काढली आहे. मणिपूर येथील घटना माणुसकीला काळीमा फासणारी आहे. तरीसुद्धा पंतप्रधानांनी संसदेच्या बाहेर जाऊन वक्तव्य केले. हा सर्व प्रकार बघता आदिवासी, गरीब, मागासवर्गीय नागरिकांना या देशात जगण्याचा अधिकार शिल्लक राहिला आहे काय? असा प्रश्न माजी मंत्री वसंतराव पुरके यांनी उपस्थित करून आपला संताप व्यक्त केला.