एकीकडे नुकसान भरपाईची प्रतिक्षा; दुसरीकडे पाण्यासाठी आभाळाकडे लक्ष,सतरा दिवसापासून पावसाची दडी, शेतकऱ्यांची चिंता वाढली

सहसंपादक : रामभाऊ भोयर

जुलै महिन्यातील अतिवृष्टी ओसरल्यानंतर मागील सतरा दिवसांमध्ये जिल्ह्यात पावसाचा थेंबही पडला नाही. त्यात तिव्र उन्हाच्या झळा अतिवृष्टीतुन वाचलेल्या पिकांना घातक ठरत असल्याने शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे. एकीकडे शेतकऱ्यांना अतिवृष्टीमध्ये झालेल्या नुकसानाची अजूनपर्यंत मदत मिळाली नाही तर दुसरीकडे पावसाअभावी पिकांचे नुकसान होवू नये म्हणून शेतकऱ्यांच्या नजरा आभाळाकडे लागल्या आहेत.

जुलै महिन्यात २१ जुलै व त्यापुर्वी व त्यानंतरही पाऊस झाला, यामध्ये ९० पेक्षा जास्त महसुल मंडळात अतिवृष्टी झाली.नदी, नाल्या काठची पिके खरडून गेली, ढगफुटी झालेल्या काही भागांमध्ये शेत जमिनी शेती योग्य राहील्या नाहीत. पुढील दहा वर्ष तेथे शेती केली जाऊ शकेल की नाही याचीही शाश्वती देता येणार नाही. ३ लाख हेक्टरवरील पिकांचे नुकसान झाले. अतिवृष्टीमुळे जिल्हातील अनेक गावे पाण्याखाली गेली, त्यांची घरे दारे, गुरे ढोरे वाहून गेली. सध्या त्यांना राहण्यासाठी घर नाही, उदरनिर्वाहासाठी आवश्यक साहित्य नाहीत अशा परिस्थिती पुरपिढीतांना पाच हजार, दहा हजाराने कुठली मदत होणार आहे. त्यांना तातडीने ठोस मदत करून त्यांना उभे करण्याची गरज आहे, त्यांच्या कुटूंबाच्या उदरनिर्वाहासाठी त्यांना रोजगार उपलब्ध करून देण्याची आवश्यकता असतांना, शासनाकडून अधिवेशन काळात कुठल्या ठोस मदतीची घोषणा करण्यात आली नाही, तर शासनाकडून कुठलीही ठोस मदत अजूनपर्यंत देण्यात आली नाही. शेतकरी अतिवृष्टीमुळे हतबल झाल्याने आत्महत्येचा मार्ग पत्करत आहे. तर दुसरीकडे पंधरा दिवसापासून पावसाने दडी मारल्याने ज्यांची पिके वाचली, त्यांच्या पुढे आता पावसाअभावी पिके वाचविण्याचे संकट निर्माण झाली आहे.

ज्यांच्याकडे ओलीतांची सुविधा उपलब्ध आहे, ते पाणी देवून पिक वाचविण्याचा प्रयत्न करीत आहेत. तर ज्यांच्याकडे ओलीताची सुविधा नाही, त्यांना मात्र आभाळाकडे नजरा लावण्याच्या पलीकडे दुसरा पर्याय शिल्लक नाही. अजून तीन दिवस जर पाऊस झाला नाही तर पाण्या अभावी पिक हातचे जाण्याचा धोका निर्माण होण्याची शक्यता नाकारता येत नाही, त्यामुळे शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे.