
वणी तालुक्यामध्ये सोयाबीन पिकावरील येल्लो मोझॅक या रोगाचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात होत असल्यामुळे शेतकऱ्यांचे उभे पिक पिवळे पडून पूर्णपणे करपत चालले आहेत. यामध्ये शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान होत आहे. त्यामुळे शेतमालाचे पंचनामे करून हेक्टरी ५० हजार रुपये मदत देण्याची मागणी कृषी मित्र गुरुदेव चिडे यांच्या नेतृत्वात दिनांक २० सप्टेंबर ला तहसीलदार निखिल धुरदळ यांच्या मार्फत राज्याचे कृषिमंत्री धनंजय मुंडे, जिल्हाधिकारी यवतमाळ, स्थानिक आमदार संजिवरेड्डी बोदकुरवार, तालुका कृषी अधिकारी यांना पाठविण्यात आलेल्या निवेदनातून केली आहे.
निवेदनात म्हटले आहे की, यावर्षी शेतकऱ्यांनी सोयाबीन पिकावर मोठा खर्च केलेला आहे मात्र पिकांवर रोगांचा प्रादुर्भाव दिसून येत असल्याने हा खर्च सुद्धा निघेल की अशी चिंता व्यक्त केली जात आहे. त्यामुळे शेतकऱ्यांच्या सोयाबीन पिकाचे झालेले नुकसानिचे तात्काळ पंचनामे करून शेतकऱ्यांना हेक्टरी 50 हजार रुपये मदत देण्यात यावी.
शेतकरी आशा बाळगून होता मात्र दोन ते तीन दिवसात बुरशी सारखा रोग आला आणि पूर्ण सोयाबीन पीक नष्ट झाले. पीक विम्यात सामावून घेणे व आपल्या महाराष्ट्र सरकारने महात्मा जोतिबा फुले कर्ज माफी जाहीर केली मात्र या यादी मधून काही शेतकऱ्यांचे नावेच नाही तर काही शेतकरी यांना अजूनही कर्ज माफिचा लाभ दिलेला नाही तरी मी शेतकऱ्यांयांच्या वतीने आपणास विनंती करतो कि आपण सदर निवेदनाची दोन ते तीन दिवसात दखल घेऊन शेतकऱ्यांना न्याय मिळवून द्यावा, अन्यथा वणी तालुक्यातील शेतकऱ्यांच्या वतीने आंदोलन करण्यात येईल याची आपण नोंद घ्यावी असा इशाराही निवेदनातून दिला आहे.
सदर निवेदनाची प्रतिलिपी स्थानिक आ. संजीव रेड्डी बोदकुरवार ,
तालुका कृषी अधिकारी वणी यांना देण्यात आली आहे.निवेदन देतेवेळी कृषी मित्र गुरुदेव चिडे, सरपंच कैलास पिपराडे, सरपंच हेमंत गौरकार, सरपंच संघटनेचे अध्यक्ष तुकाराम माथनकर, परशुराम पोटे, राजु कावडे व शेतकरी उपस्थित होते.
