सप्तशृंगी देवी,परळी वैजनाथ आणि घृष्णेश्वर तीर्थक्षेत्रांच्या ५३१ कोटींच्या विकास कामांना शासनाची मान्यता

मुंबई, दि. ९ : राज्यातील तीर्थक्षेत्रांच्या विकास आराखड्यास मान्यता देण्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखालील शिखर समितीची आज बैठक झाली. या बैठकीत श्री क्षेत्र परळी वैजनाथ ज्योर्तिलिंग विकासाच्या २८६.६८ कोटी रुपयांच्या सुधारित विकास आराखड्यास तसेच श्री क्षेत्र घृष्णेश्वर तीर्थक्षेत्राच्या सुधारित १६३ कोटी आणि श्री क्षेत्र सप्तशृंगी देवी या तीर्थक्षेत्राच्या ८१.८६ कोटीच्या सुधारित आराखड्यास मान्यता देण्यात आली. तीर्थक्षेत्री येणाऱ्या भाविकांना चांगल्या सोयी- सुविधा देण्यासाठी जिल्हा प्रशासनाने दक्षता घ्यावी आणि परिसरात पर्यटनवाढीसाठी देखील प्रयत्न करावेत, असे निर्देश मुख्यमंत्र्यांनी यावेळी दिले.
मंत्रालयात झालेल्या शिखर समितीच्या या बैठकीस उपमुख्यमंत्री अजित पवार, कृषीमंत्री धनंजय मुंडे, आमदार प्रशांत बंब, मुख्य सचिव मनोज सौनिक, वित्त विभागाचे अपर मुख्य सचिव डॉ. नितीन करीर, नगरविकास विभागाचे प्रधान सचिव डॉ. गोविंदराज, ग्रामविकास विभागाचे प्रधान सचिव एकनाथ डवले, बीडच्या जिल्हाधिकारी दीपा मुधोळ आदी उपस्थित होते. छत्रपती संभाजीनगरचे पालकमंत्री संदिपान भुमरे, जिल्हाधिकारी आस्तिक कुमार पाण्डेय दूरदृश्यप्रणालीच्या माध्यमातून व इतर सहभागी झाले होते.