शेतकऱ्याला शेतीच्या सिंचनासाठी दिवसाला वीज पुरवठा द्या- माजी आमदार प्रा.राजु तिमांडे

महावितरण कंपनीने वीज बिलाची सुलतानी वसुली थांबवावी.

माजी आमदार प्रा.राजु तिमांडे यांचे मुख्यमंत्री,उपमुख्यमंत्री व पालकमंत्री यांच्याकडे मागणी.

हिंगणघाट:- ०३ नोव्हेंबर २०२३
शेतक-याला शेतीच्या सिंचनासाठी दिवसाला विद्युत पुरवठा देण्याबाबत महाराष्ट्र प्रदेश राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे संघटक सचिव तथा माजी आमदार प्रा राजू तिमांडे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार, पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार, जिल्हाधिकारी वर्धा यांना उपविभागीय अधिकारी मार्फत निवेदनाद्वारे मागणी करण्यात आली.
खरीपच्या हंगाम संपुन रब्बीच्या हंगामाला सुरूवात झाली असुन शेतक-यांना दिवसभर विद्युत पुरवठा देण्यात यावा अशी मागणी वर्धा जिल्ह्याचे पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांची भेट घेऊन माजी आमदार प्रा.राजु तिमांडे यांनी निवेदनाव्दारे केली आहे.
शेतक-यांचे हातात आलेले सोयाबीनचे पिक मागील १५ ते २० दिवसापासुन बुरीशजन्य रोगामुळे करपुन गेले असुन उत्पन्नात खुप मोठया प्रमाणात घट झाली आहे. काही शेतक-याच्या शेतात एकरी १ किलो सोयाबीन होत नसल्यामुळे गुरे – ढोरे चरण्यास सोडले आहे. तर काहींनी शेतात रोटाव्हेटर मारून रब्बीच्या हंगामासाठी शेत तयार करण्यास लावले आहे. ऑगस्ट महिण्यात पडलेला पावसाचा सारखा खंड आणि ३ सप्टेंबर पासुन आलेल्या पावसामुळे सोयाबीनचे पिक बुरशिजन्य रोगामुळे मरण पावले.
सप्टेंबर महिण्यात पडलेल्या पावसामुळे जोमात असलेले कपासीच्या पिकाचे पात्या व फुले उन्मळून पडुन बुरशिच्या रोगामुळे झाड खाली झाले आहे. मागील २५ ते ३० दिवसापासुन पाऊस नसल्यामुळे कपासीच्या पिकाला पावसाची अत्यंत आवश्यकता आहे. कपासीच्या वाठीवर शेंडयावर फुल व पात्या धरण्यासाठी ओलीताची अत्यंत आवश्यकता आहे.
सिंचनासाठी शेतक-याला शेतात ४ दिवस सकाळी व ३ दिवस रात्रीच्या विज पुरवठा करण्यात येतो. त्यामुळे रात्रीच्या वेळेस ओलीत करणे कठीन झाले आहे. काही भागात बाघाच्या दहशतीने शेतकरी रात्री शेतात जावु शकत नाही. तसेच रोही, रानडुक्कर इत्यादि जंगली जनावरामुळे शेतकरी रात्री सिंचन करू शकत नाही.तरी सरकारने मेटाकुळीस आलेल्या शेतक-याला सिंचनासाठी दिवसभर विद्युत पुरवठा करण्यात यावा.
सोयाबीनचे पिक हातातुन गेल्यामुळे शेतक-याच्या शेतीची आणेवारी ५० टक्याच्या आंत आहे.त्यामुळे थकीत बिल असलेल्या शेतक-यांची लाईन कापु नये. महावितरण कंपनीने विज बिलाची सुलतानी वसुली थांबवावी. निसर्गाच्या लहरीपणामुळे तुटलेला शेतकरी अडचणीत सापडला असुन त्याला उभा करण्यासाठी सरकारने मदत करणे आवश्यक आहे.
तरी अस्मानी संकटात सापडलेल्या शेतक-याला कापुस, तुर, हरभरा, गहु, ज्वारी इत्यादि पिकासाठी सिंचन करण्याचे दृष्टिने दिवसभर विज पुरवठा करण्यात यावा. अशी मागणी महाराष्ट्र प्रदेश राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे संघटक सचिव तथा माजी आमदार प्रा.राजू तिमांडे यांच्यावतीने करण्यात आली आहे.