वडकी पोलिसांनी शेतातील विहिरीतील मोटर चोरास ठोकल्या बेड्या: चोराकडून आप्पाची मोटरसायकल जप्त


राळेगाव तालुका प्रतिनिधी रामभाऊ भोयर

सध्या सर्वत्र चोरीचे प्रमाण वाढले असून अशाच एका शेतातील मोटर चोरीच्या प्रकरणाचा वडकी पोलिसांनी छडा लावून चोरी गेलेली मोटर व त्यासोबतच अपाचे कंपनीची मोटरसायकल असा एकूण साठ हजाराचा मुद्देमाल वडकी पोलीस स्टेशनचे कर्तव्यदक्ष ठाणेदार विजय महाले यांचे मार्गदर्शनात जमादार अरुण भोयर व हवालदार आकाश कुदुसे यांनी जप्त केला.
वडकी पोलीस स्टेशनला नारायण राऊत राहणार चनई तालुका वेळापूर यांनी दिलेल्या रिपोर्टनुसार वडकी पोलीस स्टेशन हद्दीतील सोनुर्ली शेतशिवारात त्यांचे शेत असून त्यांच्या शेतातील विहिरीतील मोटरचा पाईप कापून कुण्या तरी अज्ञात इसमाने विहिरीतील मोटर चोरून नेल्याचे रिपोर्ट दिला होता. फिर्यादीच्या जबानी रिपोर्ट वरून पोलीस स्टेशनला अप.न.५५७/२०२३ कलम ३५७ भादवी चा नोंद करून दिनांक ३/११२०२३ रोजी वडकी पोलीस स्टेशनचे ठाणेदार विजय महाले यांच्या मार्गदर्शनात जमादार अरुण भोयर व आकाश कुदुसे यांनी गोपनीय माहितीच्या आधारे आरोपी गोलू उर्फ धनराज रतन आत्राम वय २१ राहणार अडणी त्याला ताब्यात घेऊन त्याचे कडून लुबी कंपनीची पाण्यातील मोटर अंदाजे किंमत १०,००० हजार रुपये व एक लाल रंगाची अपाची मोटरसायकल किंमत अंदाजे ६०,००० किमतीचा मुद्देमाल जप्त केला. व आरोपीला अटक करून राळेगाव कोर्टात रवाना करण्यात आले असून सदर गुन्ह्याची माहिती स्थानिक गुन्हे शाखा यवतमाळ यांना देण्यात आली .
सदर चोरीच्या प्रकरणाचा छडा वडकी पोलीस स्टेशनचे ठाणेदार विजय महाले यांचे मार्गदर्शनात जमादार अरुण भोयर व आकाश कुदुसे यांनी लावला. वडकी पोलीस स्टेशनच्या या कामगिरीबद्दल परिसरात त्यांचे कौतुक होत आहे.