
राळेगाव तालुका प्रतिनिधी रामभाऊ भोयर
लोकशाही चे चार स्तंभ शासन, प्रशासन, न्यायपालिका आणि वर्तमानपत्र असून वर्तमानपत्रातून छापून येणाऱ्या वृतातून आणि साहित्यातून समाजाला चांगली दिशा मिळते असे प्रतिपादन राज्याचे माजी शालेय शिक्षण मंत्री प्रा. वसंत पुरके यांनी साप्ताहिक राळेगाव समाचार ३१ व्या दिवाळी अंकाचे प्रकाशन सोहळ्याच्या अध्यक्षस्थानावरून व्यक्त केले.
राळेगाव समाचार च्या दिवाळी अंकाचे विमोचन राळेगाव कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती ऍड. प्रफ्फुलभाऊ मानकर व केशव पवार गटविकास अधिकारी यांच्या हस्ते करण्यात आले यावेळी ऍड. प्रफ्फुल मानकर यांनी राळेगाव सारख्या ग्रामीण आदिवासी बहुल तालुक्यातून वाचनीय असा दिवाळी चा अंक प्रकाशित करून नवोदित साहित्यिकांना व्यासपीठ उपलब्ध करून देण्याचं कार्य राळेगाव समाचार करीत असल्याचे सांगितले.
यावेळी शिवसेना शिंदे गटाचे शहर प्रमुख संतोष कोकुलवार, राळेगाव तालुका पत्रकार संघाचे अध्यक्ष राजू रोहणकर, यांची समायोचित भाषणे झाली.
यावेळी प्रकाशन सोहळ्याचे प्रास्तविक राळेगाव समाचार चे संपादक फिरोज लाखाणी यांनी करतांना सांगितले की, ग्रामीण भागातील तळागाळातील अन्याग्रस्तांना न्याय मिळवून देण्यासाठीचं या साप्ताहिकाची निर्मिती झाली आहे.
या प्रकाशन सोहळ्याला राळेगाव नगर पंचायतीचे नगराध्यक्ष रवींद्र शेराम, खविस चे अध्यक्ष मिलिंद इंगोले, उपनगराध्यक्ष जानराव गिरी, शिवसेनेचे तालुका प्रमुख विनोद काकडे, राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुका अध्यक्ष दिलीप कन्नाके, जिल्हा परिषदेच्या माजी सदस्या श्रीमती उषाताई भोयर, राळेगाव पंचायत समितीचे माजी सभापती प्रशांत तायडे, ग्राविका अध्यक्ष सचिन हुरकुंडे, नगरसेविका पुष्पा किन्नाके, राळेगाव तालुका पत्रकार संघाचे अध्यक्ष महेश शेंडे सह मान्यवर उपस्थित होते.
कार्यक्रमाचे खुमासदार संचलन प्रसिद्ध साहित्यिक व कवी विनय मिरासे ” अशांत” यांनी करून प्रकाशन सोहळ्याला रंगत आणली.
यावेळी ११ वर्षाच्या आचल गजानन चौधरी हिने अतिशय मार्मिक अशी कविता अंकात दिली त्याबद्दल राळेगाव समाचार च्या वतीने मान्यवरांच्या हस्ते तिचा शाल, पुष्पगुच्छ व मानधन देऊन सन्मान करण्यात आला. तिच्या कवितेतील दोन ओळी या ठिकाणी
शीर्षक “झाड लावत का नाही”
सावलीत जायची तुले लई घाई
अरे माणसा ! तुले समजत का नाही ?
प्रकाशन सोहळ्याला राळेगाव समाचार चे हितचिंतक व वाचकवर्ग उपस्थित होते. उपस्थितांचे आभार संपादक फिरोज लाखाणी यांनी मानले.
