आदिवासी समाजाचे आरक्षण लाटण्यासाठी बुलढाणा जिल्ह्यातील मोताळा तालुक्यामधील तरोडा येथील जिल्हा परिषदेच्या शाळेत चक्क १२०० विद्यार्थ्यांची मूळ ‘जात’ ब्लेडने खोडून ‘नायकडा’ करण्यात आली आहे. ‘नायकडा’ ही जात नोंद करतांना वेगळी शाई, वेगळे अक्षरात ‘कडा’ , ‘यकडा’, ‘नायकडा’ असे शब्द जातीच्या रकान्यात नोंदवून नियमबाह्यरित्या फेरबदल करण्यात आल्या प्रकरणी संबंधित दोषींवर कठोर कारवाई करण्याची मागणी राज्याचे मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, बुलढाणा जिल्ह्याचे जिल्हाधिकारी, जिल्हा पोलीस अधिक्षक, मुख्य कार्यकारी अधिकारी यांचेकडे ट्रायबल फोरम यवतमाळ जिल्हा उपाध्यक्ष अंकित नैताम यांनी केली आहे.
राज्यात अनुसूचित जमातीच्या यादीत क्रमांक ३५ वर ‘नायकडा’ ही जमात आहे. या जमातीच्या नामसद्रुष्याचा गैरफायदा घेण्यासाठी १२०० विद्यार्थ्यांच्या जातीच्या रकान्यात नियमबाह्यरित्या फेरबदल करण्यात आल्याची बाब अनुसूचित जमाती प्रमाणपत्र तपासणी समिती औरंगाबाद यांनी अजय ईश्वरसिंग भोकन, आदित्य किशोरसिंग भोकन, पवन भागचंद भोकन यांच्याबाबत दिलेल्या निर्णयात उघड झाली आहे.
शालेय अभिलेखातील मूळ जातीच्या नोंदी ब्लेडने खोडून फेरबदला बाबत तत्कालीन मुख्याध्यापक, केंद्रपमुख व इतर पदाधिकारी यांच्या उपस्थितीत ६ मे २००७ रोजी या प्रकरणाची चौकशी झाली. त्या चौकशी अहवालाची छायांकित प्रत समितीने हस्तगत केली आहे.तसेच समितीने शीतल गणेश बस्सी ( नस्ती क्र.४/ ५१५/ इडीयु/०४२०१८/ ११०८६८) यांच्या ‘नायकडा’ दाव्याच्या पडताळणी दरम्यान जिल्हा परिषद तरोडा शाळेचे मुख्याध्यापक यांना मूळ अभिलेखासह समिती समक्ष बोलावले असता गावातील अज्ञात इसमांनी सन १९८६ साली शाळेचे कुलूप तोडून मूळ शालेय अभिलेखामध्ये जातीच्या नोंदीत फेरबदल करण्यात आलेला असल्याची माहिती सादर केली आहे.
सदर घटनेच्या अनुषंगाने गटशिक्षणाधिकारी पंचायत समिती मोताळा जि.बुलढाणा आणि इतर सदस्य यांच्या समितीने सादर केलेल्या अहवालाची प्रत जातपडताळणी समितीसमोर सादर करण्यात आली आहे.नमूद अहवालामध्ये शाळेतील अभिलेख्यातील सुमारे १२०० विद्यार्थ्यांच्या मूळ जातीच्या नोंदी ब्लेडने नष्ट करुन ‘नायकडा’असा फेरबदल करण्यात आल्याची वस्तुस्थिती नमूद केली आहे.तसेच नमूद शाळेतील सन १९६८ आणि १९५२-५३ या वर्षातील हजेरी बुकाचे अभिलेख समितीला प्राप्त झाले असून तरोडा या गावात एकही ‘नायकडा’ जातीचा विद्यार्थी शाळेत दाखल झाला नसल्याचे हजेरीपटातील नोंदी आधारे दिसून आले आहे.असेही निवेदनात नमूद आहे.