
सहसंपादक : रामभाऊ भोयर
ग्राहक संरक्षण कायद्यामुळे ग्राहकांना फार मोठ्या प्रमाणात दिलासा मिळू लागला आहे. ग्राहकांनी व्यवहारातील सुरक्षीततेसाठी वस्तू किंवा सेवा विकत घेताना पक्के बिल अवश्य घ्यावे. ग्राहकांना व्यवहारात अडचणी आल्यास ग्राहक पंचायत सारख्या स्वयंसेवी संस्थेची मदत घ्यावी, असे आवाहन उपविभागीय अधिकारी सुधीर पाटील यांनी येथील प्रशासकीय भावनात झालेल्या राष्ट्रीय ग्राहक दिना प्रसंगी अध्यक्षीय स्थानावरून उपस्थित नागरिकांसमोर बोलताना केले.
ग्राहकांना ग्राहक संरक्षण कायद्यानंतर विविध हक्क व अधिकार मिळाले आहे. ग्राहकांनी एमआरपी पेक्षा अधिक दराने वस्तू खरेदी करू नये असे तहसीलदार अमित भोईटे यांनी यावेळी सांगितले. ग्राहकांच्या तक्रार निवारणाच्या प्रशासकीय, न्यायालयीन व ग्राहक पंचायतीच्या विविध पद्धती विषयी माहिती ग्राहक पंचायतचे तालुका अध्यक्ष व जिल्हा उपाध्यक्ष डा. के. एस. वर्मा यांनी दिली. यावर्षी शासनाने जाहीर केलेल्या इलेक्ट्रॉनिक व डिजिटल व्यवहारात ग्राहकांचे संरक्षण या थिम वरील माहिती देऊन विविध उदाहरणासह ग्राहकांना न्याय मिळण्याच्या पद्धती विषयी सखोल विवेचन वर्मा यांनी केले. शेतकऱ्यांनी त्यांच्या तक्रारी निसंकोच सादर कराव्या, त्यावर दखल घेऊन त्वरित कारवाई केल्या जाईल असे तालुका कृषी अधिकारी अमोल जोशी यांनी सांगितले. ग्राहक म्हणून जागरूक राहण्याची आवश्यकता सचिव प्राचार्य मोहन देशमुख यांनी प्रतिपादित केली. यावेळी उपाध्यक्षा शोभाताई इंगोले,सदस्य गजानन काळे, माधुरीताई डाखोरे, भावनाताई खनगन आदी हजर होते. पुरवठा विभागातील संध्या मनवर यांनी संचालन व आभार प्रदर्शन केले. माधुरी घाटुले यांनी यशस्वीतेसाठी प्रयत्न केले.
