
रामभाऊ भोयर
चहांद, किन्ही जवादे येथील स्व. भैयासाहेब ऊर्फ श्रीधरराव जवादे हे मागील ७२ वर्षांच्या लोकसभेच्या इतिहासतील राळेगाव तालुक्यातून निवडून गेलेले एकमेव खासदार आहेत. विशेष म्हणजे श्रीधरराव नथ्थोबाजी जवादे, विधानसभा आमदार आणि जानराव जवादे विधान परिषद आमदार एकाच वेळी एकाच कुटुंबातील दोन आमदार असण्याचे त्या काळातील ते एकमेव उदाहरण होते.
पूर्वी यवतमाळ लोकसभा मतदारसंघ होता. २००९ मध्ये पुनर्रचनेत यवतमाळ-वाशिम मतदारसंघाची निर्मिती झाली. यवतमाळ लोकसभा मतदारसंघातून १९७७ साली काँग्रेसकडून गाय-वासरू या चिन्हावर स्व. भैयासाहेब ऊर्फ श्रीधरराव जवादे हे निवडून गेले होते. सहाव्या लोकसभेचे ते सदस्य होते. २३ मार्च १९७७ ते २२ ऑगस्ट १९७९ या कालावधित त्यांनी या मतदारसंघाचे प्रतिनिधित्व केले होते. १९७७ मधील आणीबाणी नंतर जनता लाट असतानाही काँग्रेसकडून त्यांनी निवडणूक जिंकली होती. भैयासाहेब स्वातंत्र्यसेनानी तसेच १९५१ ते १९५७ या सालात आमदारसुद्धा होते. राळेगावपूर्वी वर्धा लोकसभा मतदारसंघात व मध्य बेरार प्रांतात सामील होते. १९५१ ते १९५७ या सालात त्यावेळी श्रीधरराव नथ्थोबाजी जवादे व बापूराव पानघाटे हे दोन आमदार या भागातील होते. भैयासाहेब काही वर्षापूर्वी अमरावती येथे स्थायिक झाले होते. वयाच्या ९२ व्या वर्षी सन २०१४ मध्ये त्यांचे तेथे देहावसान झाले. मात्र, आजही जुन्या पिढीतील लोक त्यांची आठवण काढतात.
