
सहसंपादक : रामभाऊ भोयर
रावेरीच्या सीता मंदिराच्या प्रांगणात ,अनेक भूमीकन्यांच्या माहेरी ,स्वयंसिद्धा सीता सन्मान हा सोहळा,आदर आनंद उत्साह आणि औत्सुक्यात साजरा होतो. रावेरीच्या या मंदिराला गर्भवती सीतेच्या झालेल्या त्यागाची करूण किनार आहे,वाल्मिकींच्या वात्सल्याचा कणखरपणा आहे , सीतेच्या लव-कुशांना घडवण्याच्या कर्तृत्वाचं कौतुक आहे.लव-कुशांच्या रणधुरंधरपणाचा परिणाम दाखवणारी श्रांत ,वेलींनी बांधलेल्या हनुमानाची मूर्ती जवळच्याच हनुमान मंदिरात आहे.युगात्मा शरद जोशींनी परित्यक्ता किंवा विधवा मातांना , जगण्याची मुलांना हिमतीने वाढवण्या-घडवण्याची ; समाजातल्या सक्षमांना तिच्यापाठी ” बापपणे “उभं राहण्याची प्रेरणा देण्यासाठी या जीर्ण दुर्लक्षित मंदिराचा जीर्णोद्धार केला आणि कारुण्याची किनार इतिहासजमा झाली.आता कर्तृत्वाचा उजळपणा ल्यायलेल्या ,महर्षि वाल्मिकींच्या वात्सल्याचा आधार घेतलेल्या स्वयंसिद्धा सीतेचे आपल्याला दर्शन होते.
यावर्षी शुक्रवार दि.१७ मे ला याच मंदिराच्या प्रांगणात सहा कर्तव्यनिष्ठ आणि कर्तृत्ववान मातांचा सन्मान करण्यात आला.
प्रवेश द्वाराशी सीता आणि लव – कुशांचे भावदर्शी चित्र!सीतेच्या आईपणाचे स्निग्ध,प्रेमळ आणि लव-कुशांचे निरागस बाळपणाचे भाव रंगरेखांतून मनात उतरत होते.स्वच्छ परिसर,छान रंगसंगती साधलेली रांगोळी,पडद्यांची सौम्य सुंदर सजावट,उन्हा-पावसाच्या लहरींवर मात करणारी ,मंडपाची बांधणी आणि खुर्च्यांची मांडणी.समोर युगात्मा शरद जोशींचं बोलकं छायाचित्र!
प्रा.लीना शेंडे यांचं सूत्र संचालन नेटकं आणि नेमकं होतं.सीता मंदिराच्या जीर्णोद्धाराच्या संकल्पनेपासून मंदीर पूर्ण होई पर्यंत ,तो विचार गावोगावी पोचवून युगात्मा शरद जोशींना सहकार्य करणाऱ्या सौ.शैलाताई देशपांडे यांनी प्रास्तविकात स्त्रियांच्या सक्षमीकरणाचा आदर्श म्हणजे सीतामाता हे खूप सहज आणि स्वाभाविक असल्याचं प्रभावीपणे सांगीतलं. सोसळ्याचे प्रायोजक,संयोजक आणि नियोजक मा.ऍड्.श्री. वामनराव चटप म्हणजे उत्साहमूर्ती! उपस्थितांपैकी अनेकांना या सोहळ्यात प्रत्यक्ष सहभागी करून घेऊन ,त्यांच्या पदांचा सादर उल्लेख करत त्यांना व्यासपीठावर अगत्याने आमंत्रित करून औपचारिकतेला सुद्धा जिव्हाळ्यात बदलण्याचं त्यांचं तंत्र काही वेगळच.उद्घाटक मा. ऍड्.दिनेश शर्मा यांचं अभ्यासपूर्ण चिंतनपर भाषण सगळ्यांनी अतिशय तन्मयतेने ऐकलं. शेतकरी संघटनेचे अध्यक्ष मा.श्री. ललित बहाळे यांचं व्यावहारिक परखड आणि खास ग्रामीण बोली शैलीची पेरणी केलेलं भाषण पुन्हा एकदा चतुरंग शेतीकडे नव्या दृष्टीने बघायला लावणारं होतं.सन्मानित झालेल्या सहाही उत्सवमूर्ती भारावून गेल्या होत्या. त्यापैकी एकीनेच भावनांना आवर घालत चार शब्दात मनोगत सांगितले.सगळ्या सत्कारमूर्तींना सन्मानपत्र,सन्मानचिन्ह,शाल, श्रीफळ आणि साडी देऊन सन्मानित केल्यावर सगळ्यांनाच कृतार्थ वाटत होते.नंतर अध्यक्षीय भाषणात मा.ऍड्.वामनराव चटप यांनी पतीच्या पश्चात मुलांना वाढवतांना घडवतांना येणाऱ्या आर्थिक अडचणींवर मात करून, स्वत:च्या आवडी निवडी बाजूला ठेवून,फक्त मुलांसाठी जगणाऱ्या या मातांचा गौरव केला . कार्यक्रमात सहभागी ,प्रत्येकाची दखल घेत मा. मधुभाऊ हरणेंनी आभारप्रदर्शन रंगतदार केलं.या भावपूर्ण कार्यक्रमाला रावेरी येथील ग्रामपंचायत सदस्य,मंदीर विश्वस्त मंडळ,रावेरीचे महिला बचत गट,भजनी मंडळ यांचं सक्रीय सहाय्य होतं.
संपूर्ण कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी पडद्यामागचे सूत्रधार …राजुऱ्याचे श्री.बाळसराफ ! त्यांनी नेहमी प्रमाणे अनेकांशी पत्रव्यवहार करून,संवाद साधून,स्वयंसिद्धांची माहिती मिळवून,त्यांना आग्रहपूर्वक निमंत्रित केले. नियोजनात कुठेही गोंधळ नाही.कामातली सुसूत्रता अगदी वाखाणण्याजोगी.
कार्यक्रमानंतरचं जेवण म्हणजे अन्नपूर्णेचा प्रसाद होता.वरणभात पापडभजी ,गरम पोळ्या ,वांग – बटाटा भाजी,कैरीची कढी आणि मऊ मोकळं पुरण.मग ..अंगत पंगत आणि गप्पांची रंगत.
स्वयंपाकघरापासून मंडपाच्या आखणी बांधणी पर्यंत सगळं नेपथ्य सजवणारे कुठे उणीव राहणार नाही अशी दक्षता घेणारे श्री.गणेश मुटे,सतीश दाणी,राजेंद्र झोटिंग ,खुशालभाऊ हिवरकर,सारंग दरणे,मुकेश धाडवे आणि रावेरीतील गजानन झोटिंग ,गोलू काकडे !
रामायणातील यज्ञांचे स्वरूप –
वाचतांना समाजातील सक्रीय विचारवंतांचा परस्पर संवाद,अनुभव कथन,समाजघटकांचे संघटन,समन्वय आणि संपूर्ण समाजाच्या समृद्धीसाठी सहकार्य.
असे वाचले होते.यज्ञासाठी काम करणाऱ्या कार्यकर्त्यांच्या काम करण्याच्या सात परिधी म्हणजे क्षमता – रीत पद्धत , याबद्दल वाचले होते .ते वर्णन सतत आठवत होते.
त्या सात पद्धती अशा…..
१)शरीराने – म्हणजे सतत यंत्रवत् काम करणे.
२)इच्छा शरीराने – म्हणजे प्रबळ इच्छेने काम करणे.
३)मानस – म्हणजे मन:पूर्वक काम करणे.
४)अंतर्मानस -म्हणजे मनात तोच एक ध्यास ठेवून काम करणे.
५)बुद्धी – म्हणजे नीट समजून.
६)पराबुद्धी – म्हणजे अतिशय कल्पकतेने.
७)जीव- म्हणजे जीव ओतून.
स्वयंसिद्धा सीतामाता मंदिराच्या प्रांगणातला हा सन्मान सोहळा म्हणजे एक यज्ञच असतो.ऍड्.श्री वामनराव चटप यांच्या अनुभवी मार्गदर्शनात सगळेच सातही पद्धतींनी काम करत असतात. येणाऱ्या माहेरवाशीणी सुद्धा मूठ चिमूट ,ओंजळ पसा ..माहेराच्या प्रेमाने देतातच.या यज्ञाच्या विचार मंथनातून प्रेरणा घेऊन ,शेतकरी भाऊबहिणी आपल्या गावी परततात.भावा बहिणींच्या भेटीत आठवणींना उजाळा मिळतो . नव्या आठवणी साठवल्या जातात.आणि जातांनाच पुढल्या वर्षी येण्याचा निश्चय केला जातो.
जनकनंदिनी सीतेच्या स्वयंसिद्ध रूपाला , यशस्वी मातृत्वाला आदर्श मानणाऱ्या शेतकरी संघटनेच्या विचारांचा हा प्रभाव आहे.
सौ.प्रज्ञा जयंत बापट.
