
सहसंपादक : रामभाऊ भोयर
घरकुल लाभार्थ्यांना मोफत रेती देण्याच्या उद्देशाने शासनाच्या वतीने मारेगाव तालुक्यातील कोसरा रेती घाट राखीव ठेवला परंतु याच रेती घाटावर वक्र दृष्टी फिरवुन रेती तस्करांनी रात्रीच्या अंधारात अवैध रेती तस्करीचा धंदा जोमात सुरू केला असुन यावर तत्काळ कारवाई करण्यात यावी अन्यथा मनसे स्टाईल ने आंदोलन करण्याचा इशारा मनसेच्या वतीने जिल्हाधिकाऱ्यांना दिलेल्या निवेदनाद्वारे देण्यात आला आहे.
वाढत्या महागाईत गोर गरीब गरजू नागरिकांना शासनाच्या वतीने मंजुर करण्यात आलेल्या घरकुल योजनेच्या लाभार्थ्यांना रेती देण्यासाठी मारेगाव तालुक्यातील कोसारा येथील रेतिघाट अनेक निर्बंध व अटी घालुन हर्रास करण्यात आला परंतु रेती तस्करांनी जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशालाच धाब्यावर बसवून रात्रीच्या अंधारात बेसुमार अवैध रेती तस्करी करून खैरी मार्गे मारेगांव तालुक्यात तसेच खैरी/वडकी मार्गे राळेगाव तालुक्यात विक्री सुरू आहे. ओव्हरलोड रेती चे टिप्पर, ट्रक, ट्रॅक्टर ने राळेगाव तालुक्यातील खैरी मार्गे वडकी परिसरातुन राळेगाव तालुक्यात धुमाकूळ घातला आहे व खैरी मार्गे मारेगांव तालुक्यात धुमाकूळ घातला आहे. त्यामुळे खैरी येथे महसूल पथकाची चोवीस तास चौकी उभी करून सुरू असलेली अवैध रेती बंद करावी.
रेतीच्या ओव्हरलोड वाहतुकीमुळे रस्त्याची तर वाट लागतच आहे शिवाय ही रेती वाहतुक करणारी वाहने भरधाव वेगाने धावत असल्याने नागरीकांच्या जीवाला धोका निर्माण झाला आहे. रात्रभर सुरू असलेल्या अवैद्य रेतीची बेसुमार वाहतुक केली जात असल्याने शासनाचे आर्थिक नुकसान होत आहे त्यामुळे याकडे लक्ष देवुन सुरु असलेली अवैध रेती तस्करी करणाऱ्या वाहनांवर दंडात्मक कारवाई करून रेती तस्करी कायमस्वरूपी बंद करण्यात यावी अन्यथा मनसे स्टाईल ने आंदोलन करण्याचा इशारा मनसेच्या वतीने जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आलेल्या निवेदनाद्वारे देण्यात आला आहे. यावेळी मनसे जिल्हाध्यक्ष देवा शिवरामवार, मनसे जिल्हा उपाध्यक्ष शंकर वरघट, मनसे यवतमाळ शहर अध्यक्ष अमीत बदनोरे, मनविसे यवतमाळ जिल्हाध्यक्ष अभीजीत नानवटकर, शैलेश आडे उपस्थित होते
चौकट
रेती तस्करीच्या धंद्यात मारेगाव व राळेगाव महसुल प्रशासन मालामाल.
कोसरा रेती घाट हा राळेगाव व मारेगाव तालुक्याच्या सीमेवर असल्याने दोन्ही तालुक्यातील रेती तस्कर या ठिकाणी मोठ्या प्रमाणात अवैध रेती उत्खनन करीत आहेत हे दोन्ही तालुक्याच्या महसुल प्रशासनाला सर्वश्रुत आहे परंतु या रेती तस्करीच्या धंद्यात कोतवाल पासुन तहसिलदार पर्यंत सर्वांनाच दरमहा एका हस्तकामार्फत पाकीट पोहचत असल्यानेच यावर कारवाई न करता महसूल प्रशासन आपले उखळ पांढरे कसे करता येईल याकडेच विशेष लक्ष देत असल्याचा आरोप नागरिक करीत आहेत.
