
सहसंपादक :रामभाऊ भोयर
राजकारणात कुणाच्या खांद्यावर कुणाचे ओझे येईल आणि कोण कुणाचा भार हलका करील याचा काही नेम राहिलेला नाही.भाजपा च्या अंतर्गत सर्व्हे ने शिवसेना यवतमाळ- वाशीम च्या उमेदवार बदलल्या गेल्या आणि अखेर पराभव पदरी पडला. राज्यात भाजपाच्या या सर्व्हेने जिंकणारे उमेदवार बदलायला लावले आणि चार ते पाच खासदार कमी झाले असा प्रत्यक्ष, अप्रत्यक्ष आरोप शिंदे गट करू लागला आहे. मात्र याच बाबीचा फायदा आता काँग्रेस व भाजपा च्या विधानसभेच्या उमेदवारांना होतांना दिसतो,राळेगाव विधानसभा मतदार संघात भाजपा व काँग्रेस उमेदवार बदलणार अशा चर्चा होत्या आता त्याला पूर्णविराम मिळाल्याची माहिती आहे.वेळेवर उमेदवार बदलाल तर काय होते याचे उदाहरण समोर असल्याने आ. प्रा. डॉ. अशोक उईके व माजी मंत्री प्रा. वसंत पुरके यांनाच उमेदवारी मिळणार जवळपास हे निश्चित झाले आहे.
भावना गवळी यांना ऐन वेळी उमेदवारी पासुन बेदखल करण्यात आले. ही उमेदवारी कायम असती तर महायुतीला या मतदार संघात विजय मिळाला असता असा दावा करण्यात येत आहे. आणि तो तर्कसंगत असल्याने त्याला नाकारता देखील येत नाही.विजयी स्टँडिंग खासदाराला यांनी घरी बसवले व पदरात पराभव पाडून घेतला हा तर्क नाकारता येत नाही.आता विधानसभेत तशी चूक करायची नाही यावर महायुती असो की महाविकास आघाडी यांच्या नेत्यांचे एकमत झाल्याची माहिती आहे.राळेगाव विधानसभा मतदार संघात आ. प्रा. डॉ. अशोक उईके यांच्या बाबत नाराजी नाही.सर्वसामान्यातला अंत्यत सर्वसामान्य माणूस वाटणे ही त्यांची खासियत. हा आमदार लोकांना आपला वाटतो, आपल्यातला वाटतो. समस्या सोडविण्यासाठी धावून येतो या त्यांच्या जमेच्या बाजू मात्र शेतकरी व सर्वसामान्य जनतेच्या प्रश्न|बाबत भाजपा ची भूमिका व धोरणा समंधी इथे नाराजी आहे. लोकसभा निवडणुकीत महाविकास आघाडीच्या उमेदवाराला 24 हजाराचे मताधीक्य मिळाल्याने भाजपा इथला उमेदवार बदलणार अशी चर्चा राजकीय वर्तुळात होती. प्रा. वसंत पुरके सारख्या दमदार नेत्याचा सातत्याने पराभव, माजी मंत्री,सीटिंग आमदार या त्यांच्या जमेच्या बाजू असतांनाही या चर्चा होत्या त्याला आता पूर्ण विराम मिळाल्याची माहिती आहे. आता निवडणुकीच्या तोंडावर उगीच इळ्याचा खिळा करायला गेले की काय होते याचा प्रत्यय आल्याने भाजपाच्या अशोक उईके यांच्या उमेदवारी वर शिक्कामोर्तब झाल्याचे बोलल्या जाते.
दुसरीकडे काँग्रेस च्या वरिष्ट वर्तुळात देखील महायुती ने वेळेवर काही उमेदवार बदलले आणि त्यांना अपेक्षित जागा मिळाल्या नाही याचा बारीक अभ्यास करण्यात आल्याची माहिती आहे. राळेगाव विधानसभा मतदार संघात नवा चेहरा दया अशी मागणी काँग्रेस वर्तुळातच कधी -मधी होते. पण आता या मागणीची हवाच लोकसभा निकालाने काढून टाकली आहे. वक्तृत्व, नेतृत्व या आघाडीवर प्रा. वसंत पुरके हे नेहमीच उजवे ठरत आले आहे. शिक्षण मंत्री असतांना त्यांनी केलेली कामे आजही आठवली जातात. मोदी लाटेतही मागील वेळी फार कमी मतांनी त्यांचा पराभव झाला. महाविकास आघाडीची ताकद त्यांच्या पाठीमागे असल्याने त्यांचा विजय सुकर होणार अशी भावना कार्यकर्त्यांमध्ये आहे. ऐन विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर काँग्रेस उमेदवार बदलणार नाही, त्या मुळे राळेगाव विधानसभा मतदार संघात भाजपा कडून आ. प्रा. डॉ. अशोक उईके व काँग्रेस कडून वसंत पुरके यांना उमेदवारी निश्चित असल्याची चर्चा आहे.
