
सहसंपादक : रामभाऊ भोयर
राळेगाव विधानसभा मतदार संघात महायुती कडून आ. प्रा. डॉ. अशोक उईके व महाविकास आघाडी कडून माजी मंत्री प्रा. वसंत पुरके यांनी उमेदवारी कायम असल्यागत प्रयत्न सुरु केले आहे. मात्र काही नवीन चेहरे स्पर्धेत दाखल झाल्याने रंगत वाढली आहे.अशोक मेश्राम यांच्या उमेदवारीची चर्चा सुरु झाल्याने राजकीय वर्तुळाच्या नजरा या कडे वळल्या, त्यांनी या बाबत भूमिका स्पष्ट केलेली नसली तरी त्यांच्या मित्र परिवाराच्या वतीने हालचाली सुरु झाल्याचे दिसते. या पार्शभूमीवर राळेगाव तालुक्याचा एकंदरीत राजकीय इतिहास काय सांगतो या कडे लक्ष वेधने महत्वाचे ठरते. राळेगाव विधानसभा (अनुसूचित जमाती) मतदारसंघ संघाची निर्मीती १९६७ साली झाली. तत्पूर्वी १९६२ च्या निवडणुकीत हा मतदार संघ येराबारा (अनुसूचित जमाती) म्हणुन राखीव होता. आतापर्यंत हा मतदारसंघाच्या निर्मीतीस ६३ वर्ष झालेत. त्यापैकी राळेगाव मतदार संघाचे ३३वर्ष मतदारसंघा बाहेरील आमदार होते. तर या मतदार संघात आतापर्यंत १३ विधान सभेच्या निवडणुका झाल्यात. त्यापैकी ८ निवडणुकीत मतदार संघाच्या बाहेरील आमदार निवडून आलेत. या निवडणुकीत भारतीय जनता पक्षाकडून तीनदा निवडणुक लढवली असुन तीनही वेळेस मतदारसंघा बाहेरील उमेदवार दिला आहे. तर काँग्रेसने मात्र १३ तेरा पैकी ७ वेळेस मतदार संघातील उमेदवार दिला. व सहा निवडणुकीत मतदार संघा बाहेरील उमेदवार दिला आहे. काँग्रेसने मात्र ७ पैकी ६ वेळेस तीन दशक वसंत पुरके याना उमेदवारी दिली.
१९६२ च्या निवडणुकीत महादेव बळीराम खंडाते (काँग्रेस) विरूद्ध सुखदेव पुंडलीक उईके (स्वतंत्र) असा झाला. या निवडणुकीत महादेव बळीराम खंडाते निवडणुकीत विजयी झाले. १९६७ च्या निवडणुकीत महादेव खंडाते या काँग्रेसच्या उमेदवाराला पाडुन श
एम.एन. भलावी (स्वतंत्र) उमेदवार निवडून आले. १९७२ च्या निवडणुकीत फॉरवर्ड ब्लॉकचे उमेदवार प्रभाकर धुर्वे यांना पाडुन, काँग्रेसचे उमेदवार आनंदराव देशमुख निवडून आलेत. १९७८ च्या
निवडणुकीत दिगंबर केलझरकर याना हरवुन,सुधाकर धुर्वे व १९८० च्या सार्वत्रिक निवडणुकीत कृष्णराव उरकुडा पोयाम याना हरवुन सुधाकर धुर्वे निवडून आलेत. १९८५ च्या सार्वत्रिक निवडणुकीत गुलाब उईके हे निवडून आलेत. १९९०च्या सार्वत्रिक निवडणुकीत नेताजी राजगडकर (जनता दल) काँग्रेसचे उमेदवार गुलाब उईके याना हरवून निवडून आलेत.
१९९५ च्या सार्वत्रिक निवडणुकीत, वसंत पुरके (काग्रेस) फक्त २९ टक्के मते घेऊन निवडून आले. या निवडणुकीत लेतुजी जुनगरे, प्रल्हाद ऊरकुडा पोयाम (शिवसेना) यांना हरवुन आमदार झालेत. माजी मंत्री प्रा.वसंत पुरके १९९९, २००४ व २००९च्या सार्वत्रिक निवडणुकीत विजयी झालेत. त्यानंतर आ. डॉ.अशोक उईके (भारतीय जनता पक्ष) २०१४ व २०१९च्या सार्वत्रिक निवडणुकीत काँग्रेसचे उमेदवार प्रा. वसंत पुरके याना हरवुन आमदार झालेत.
राळेगाव मतदारसंघाचे अनेक वेगळे वैशिष्ट्य आहे. राखीव मतदार संघ असल्याने इथल्या अन्य उमेदवारांना आमदार होता येत नाही पण आमदार घडवता येतो. राळेगाव, कळम, बाभुळगाव या तीनही तालुक्यात सहकार क्षेत्रावर वर्चस्व असणारे नेते आपला माणूस आमदार व्हावा या साठी प्रयत्न करतात. या वेळी राज्याच्या राजकारणात कमालीच्या उलथापालथी झाल्या आहे. शिवसेना(ubt),काँग्रेस, राष्ट्रवादी ( sp) यांची महाविकास आघाडी व भजपा, शिवसेना, राष्ट्रवादी ( ap) यांची महायुती यांच्यात लढत होणार हे निश्चित, राळेगाव विधानसभा मतदार संघात मात्र भूमिपुत्र या निकषाला महत्व राहील असा अंदाज दिसतो.
