बियाण्याची उधारी कशी फेडवी हेच तर कळेना
खरीप हंगामातील पिके हातून जाताहेत;सूर्यदर्शन नाही पिकांची वाढ खुंटली,शेतकरी चिंतित

सहसंपादक : रामभाऊ भोयर:-


यंदा पावसाळा सुरू होताच खरीप हंगामावर उभे राहिलेले अस्मानी संकट अधिकच तीव्र होत आहे. पेरणीसाठी बियाणे उधारीवर घेतले. त्यासाठी उसनवारी केली. सुरवातीला पावसाने उघडदीप दिल्याने दुबार पेरणी करावी लागली त्यानंतर जुळवाजुळव करून पेरणी साधली मात्र सततच्या पावसामुळे डवरणी खुरपणी होत नाही तसेच पिकांची वाढ खुंटली तर काही पिके सडत आहेत त्यामुळे शेतकरी आर्थिक संकटात सापडला आहे.
पिकांना नवसंजीवनी देणारा पाऊस यंदा मात्र पिकांसाठीच जिवघेणा ठरत आहे. त्यामुळे यावर्षीचा खरीप हंगाम जास्तीच्या पावसाने पूर्णता हातातून गेल्यात जमा आहे. अगोदरच उधारी आणि उसनवारीकरून कशीबशी पेरणी केली. त्या शेतकऱ्यांवर आजमितीस मोठे आर्थिक संकट ओढावले आहे. पेरणीसाठी केलेली उसनवारी फेडावी कशी? मुलबाळ तरी जगवावेत कसे, असा यक्ष प्रश्न शेतकऱ्यांसमोर उभा ठाकला आहे.
राळेगांव तालुक्याती जुलै महिन्यापासून आतापर्यंत संततधार पाऊस सुरूच आहे. महिनाभराच्या काळात फक्त तीन ते चार दिवस असेच पावसाचे प्रमाण फक्त थोडे कमी होते. आता पुन्हा पावसाने जोर धरला असून महिनाभरापासून शेतात पाणीच पाणी साचून पिके पाण्याखालीआल्याने यंदाचा पूर्ण खरीप वाया गेला आहे. नदी, नाले, ओढे पूर्णतः भरून वाहत असून नदी काठावरील व ओड्याच्या काठावरील शेती अगोदरच खरडून गेली आहे. आता या संततधार पावसाने कापूस, सोयाबीन पिके पाण्यात गेल्याने पेरणीचा खर्चही निघणार नसल्याने – पेरणीसाठी काढलेले कर्जही – भेटणार की नाही? या चिंतेत शेतकरी असून येणाऱ्या काळात – पेरणीसाठी केलेली उधारी आणि उसनवारी फेडावी कशी? घरातील लेकर-बाळांना काय खाऊ घालावे? या चिंतेत शेतकरीराजा आहे.

वरुणराजा आतातरी थांब…

ज्यावेळेस पाऊस पाहिजे होता, त्यावेळी पाऊस पडला नाही. आता पिके हाताला आली असून पाऊस थांबण्याचे नाव घेत नाही. संततधार पावसामुळे शेतात जाणेही शक्य होत नाही. शेती मशागतीची कामेही करता येत नाहीत. सततच्या पावसामुळे खरीप पिके हातातून जात आहेत. वरुणराजा थोडे थांब, अशी विनवणी शेतकरीराजा करीत आहे.