
सहसंपादक : रामभाऊ भोयर
देशात कुणबी समाजाची संख्या सुमारे 40 टक्के आहे, परंतु हा समाज पोटजातींमध्ये विखुरला असल्यामुळे स्वातंत्र्यानंतरच्या 75 वर्षांतही समाज अनेक समस्यांना सामोरा जात आहे. शासन आणि प्रशासनात या समाजाला अपेक्षित प्रतिनिधित्व मिळालेले नाही. यासाठी कुणबी समाजातील सर्व पोटजातींनी एकत्र येणे काळाची गरज असल्याचे प्रतिपादन भंडारा-गोंदिया जिल्ह्याचे माजी खासदार मधुकर कुकडे यांनी केले.
राष्ट्रीय कुणबी महासंघाच्या वतीने आयोजित चंद्रपूर येथील राजवाडा हॉटेलमध्ये कुणबी समाजाच्या मेळाव्यात मधुकर कुकडे उदघाटक म्हणून बोलत होते. यावेळी त्यांनी समाजाच्या एकत्र येण्याचे महत्त्व विशद केले. या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान राष्ट्रीय कुणबी महासंघाचे अध्यक्ष आणि प्रसिद्ध पत्रकार, दलित मित्र व आदिवासी सेवक डी. के. आरीकर यांनी भूषवले. त्यांनी जातीय जनगणना होणे आणि लोकसंख्येच्या प्रमाणात प्रत्येक स्तरावर प्रतिनिधित्व मिळावे, अशी मागणी केली. लवकरच दिल्लीमध्ये राष्ट्रीय कुणबी महासंघाचे केंद्रीय कार्यालय सुरू होणार असल्याची घोषणाही त्यांनी यावेळी केली.
मेळाव्यात विविध जिल्ह्यांमधून आलेल्या कुणबी समाजाच्या पदाधिकाऱ्यांना नियुक्तीपत्र देण्यात आले. तसेच नागपूरमध्ये लवकरच महासंघाच्या भव्य अधिवेशनाचे आयोजन होणार असल्याची घोषणा करण्यात आली. कार्यक्रमाच्या प्रारंभी संत तुकाराम, छत्रपती शिवाजी महाराज आणि क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमांना अभिवादन करण्यात आले आणि दीप प्रज्वलन करून कार्यक्रमाची सुरुवात झाली. उपस्थितांनी नागपूर विद्यापीठाचे माजी कुलगुरू डॉ. सुभाष चौधरी यांना श्रद्धांजली अर्पण केली.
या कार्यक्रमाला राष्ट्रीय कुणबी महासंघाचे उपाध्यक्ष प्राध्यापक शेषराव येलेकर, डॉक्टर बळवंत भोयर प्रवक्ते राजू राऊत, महिला विंगच्या प्रदेशाध्यक्ष रीनाताई पांडे, सचिव रमेश बोरकुटे, ऍड. संजय ठाकरे, ऍड.पुरुषोत्तम ऍड. हिराचंद बोरकुटे,सातपुते, डॉ. अभिलाषा गांवतुरे, विनोद नवघडे, डॉ. प्रदीप महाजन, अमरावती विभाग अध्यक्ष संदीप तेलंगे, विलास नेरकर प्रकाश काळबांधे, सुधीर कोरडे, अतुल ठाकरे, पी. एस. आरीकर, वैशाली रोहणकर, सुधाकर काकडे तसेच अनेक मान्यवर उपस्थित होते.
