
राळेगाव तालुका प्रतिनिधी रामभाऊ भोयर
राळेगाव तालुक्यातील खैरी तसेच कोच्ची येथील लोक विद्यालय या शाळेत वर्ग ९ वी मध्ये शिकणाऱ्या दोन मुलींचा कोच्ची येथील जलजिवन मिशनच्या विहीरीजवळ वर्धा नदी पात्रात बुडून दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना ७ आॅक्टोंबर रोजी दुपारी १ वाजताचे सुमारास घडली. या घटनेत एक मुलगी बचावली असुन या घटनेने परिसरात हळहळ व्यक्त होत आहेत.
खुशी किशोर राऊत (१५) रा.खैरी व प्रांजली भानुदास राखुंडे (१५) रा.कोच्ची असे मृतक मुलींचे नाव असून खैरी येथील लोकविद्यालय शाळेत इयत्ता नववीत शिकणाऱ्या सानिया गजानन बोडे खैरी खुशी किशोर राऊत खैरी व प्रांजली भानुदास रांखुडे कोच्ची या तिनही मैत्रीणी पोहण्यासाठी खैरी येथून घरच्यांना न सांगता कोच्ची येथील वर्धा नदीपात्रात दुपारच्या सुमारास पोहण्यासाठी गेल्या होत्या. दरम्यान सानिया बोडे हिची प्रकृती ठिक नसल्यामुळे ती नदी काठावर थांबली होती तर खुशी किशोर राऊत व प्रांजली भानुदास राखुंडे या दोघी नदीपात्रात पोहण्यासाठी उतरल्या. ज्या ठिकाणी त्या पोहण्यासाठी गेल्या होत्या त्या ठिकाणी पाण्याचा अंदाज न आल्यामुळे त्या दोघीही बुडाल्या त्या बुडत असल्याचे पाहुन काठावर उभी असलेल्या सानिया बोडे हिने कोच्ची गावात पळ काढला व आरडाओरड केली नंतर गावकरी नदीवर पोहचले तसेच पोलीस प्रशासन सुद्धा पोहचले पोलीस व गावकऱ्यांनी त्यांचा नदीपात्रात शोध घेऊन बाहेर काढले दरम्यान त्यांना खैरी येथील खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. खाजगी डॉक्टरांनी त्यांना तातडीने शासकीय रुग्णालय राळेगाव येथे हलविले मात्र तेथे त्यांना वैद्यकीय अधिकाऱ्यांनी मृत घोषीत केले असुन शव विच्छेदनाची प्रक्रिया सुरु आहेत.
