
सहसंपादक : रामभाऊ भोयर
शोषणमुक्त समाज निर्मितीचे ग्राहक पंचायतीचे लक्ष आहे. राष्ट्रीय स्तरावर ग्राहकांच्या हितासाठी झटणारी ही एक सर्वात मोठी संस्था आहे. पन्नास वर्षात ग्राहक पंचायतीने अनेक कार्ये केली आहे, त्याचबरोबर अजूनही बराच मोठा पल्ला गाठावयाचा आहे. ग्राहक पंचायतच्या कार्यकर्त्यांनी काल कोठे होतो, आज कुठे आहोत, व उद्या काय करावयाचे आहे हे ठरवून कार्यप्रवण राहण्याचे आवाहन विदर्भ प्रांत व यवतमाळ जिल्हा ग्राहक पंचायतीचे अध्यक्ष डॉ. नारायणराव मेहरे यांनी अध्यक्ष स्थानावरून मार्गदर्शन करताना उपस्थितांना केले. यावेळी मंचावर तालुका अध्यक्ष डॉ. के.एस. वर्मा व कोषाध्यक्ष भूपेंद्र कारीया होते.
डॉ.नारायणराव मेहरे यांच्या प्रमुख उपस्थितीत तालुका कार्यकारणीतील पदाधिकाऱ्यांकडून डॉ. श्यामसुंदर गलाट यांना वैद्यकीय सेवा, प्रकाशराव झलके व गजाननराव सुरकर यांना कापुस ते खादी वस्त्र निर्मिती, ग्रामोद्योग क्षेत्रातील कामगिरीवर उत्कृष्ट ग्राहक सेवा पुरस्काराने शाल, श्रीफळ, स्मृतीचिन्ह व सन्मानपत्र देऊन गौरविण्यात आले. प्रकाश झलके यांच्या अनुपस्थितीत त्यांच्या अर्धांगिनी वैशालीताईंनी हा पुरस्कार स्विकारला.
यावेळी कार्यकारणीचे तालुका सचिव प्रा. मोहन देशमुख, उपाध्यक्ष शोभाताई इंगोले, उपाध्यक्ष डॉ. अश्विनी थोडगे, संघटक विनय मुणोत, प्रसिद्धी प्रमुख राजेश काळे, सदस्य गजाननराव काळे, गोपाळराव बुरले सर, पुरुषोत्तम मेंढुलकर, माधुरीताई डाखोरे, भावनाताई खनगण, छायाताई पिंपरे व झाडगाव व वडकी येथील ग्राहक पंचायतचे पदाधिकारी व सदस्य व शहरातील गणमान्य नागरिक उपस्थित होते. प्रास्ताविकात डॉ. वर्मा यांनी तालुक्यात केलेल्या कामाची माहिती दिली. संचालन राजेश काळे यांनी केले. व आभारप्रदर्शन गोपाळराव बुरले यांनी केले.
