ढाणकी, दि. २८: आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मतदारांना निर्भयतेने मतदान करण्यास प्रोत्साहित करण्यासाठी बिटरगाव पोलीस स्टेशनच्या वतीने ढाणकी नगरीत भव्य रूट मार्चचे आयोजन करण्यात आले. उपविभागीय पोलीस अधिकारी हणुमंत गायकवाड यांच्या नेतृत्वाखाली २८ ऑक्टोबर रोजी सायंकाळी ६ वाजता झालेल्या या शक्तीप्रदर्शनात बिटरगाव पोलीस स्टेशनचे ठाणेदार संतोष मनवर यांच्यासह बीएसएफ, आरसीपीचे जवान, तसेच स्थानिक पोलीस अधिकारी आणि अंमलदारांचा समावेश होता.
ढाणकी नगरीत त्याच दिवशी बाजार भरत असल्याने आसपासच्या गावातील मतदार मोठ्या संख्येने खरेदीसाठी आले होते. या संधीचा उपयोग करत ठाणेदार संतोष मनवर यांनी छत्रपती शिवाजी महाराज चौक, मेन लाईन, नवीन बसस्थानक या ठिकाणी नागरिकांना जागरूक केले आणि निर्भयपणे मतदानाचा हक्क बजावण्याचे आवाहन केले. निवडणुकीच्या काळात शांतता राखण्यास पोलिस दल कटिबद्ध असल्याचे त्यांनी सांगितले.
मिरवणुकीच्या मार्गावर पोलीस दलाचे शिस्तबद्ध पथक, बीएसएफ व आरसीपीच्या जवानांच्या तुकड्या, तसेच बिटरगाव पोलिसांचे अधिकारी आणि अंमलदार पाहून नागरिकांमध्ये आकर्षण निर्माण झाले. ठिकठिकाणी नागरिकांच्या मोठ्या गर्दीने या शक्तीप्रदर्शनाचे स्वागत केले. पोलिसांच्या उपस्थितीमुळे ढाणकी नगरीत एक सुरक्षिततेचे वातावरण निर्माण झाले, ज्यामुळे मतदारांना निर्भयपणे मतदान करण्याचा विश्वास मिळाला.
ठाणेदार संतोष मनवर यांनी उपस्थितांना आश्वासन दिले की, मतदानाच्या वेळी कोणत्याही प्रकारच्या अडचणी आल्यास तत्काळ पोलिसांशी संपर्क साधावा. मतदानादरम्यान परिसरात शांतता व सुव्यवस्था राखण्याची जबाबदारी पोलिसांवर असून, नागरिकांनी कोणत्याही प्रकारच्या दबावाशिवाय मनमोकळेपणाने मतदान करावे, असे आवाहनही त्यांनी केले.
पोलिस दलाच्या अचानक आगमनाने चौकाचौकात नागरिकांनी मोठ्या संख्येने गर्दी केली आणि पोलीस दलाच्या शिस्तबद्ध रूट मार्चला कुतूहलाने पाहिले. विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आयोजित केलेले हे शक्तीप्रदर्शन नागरिकांमध्ये सुरक्षिततेबद्दलचा विश्वास दृढ करण्यास उपयुक्त ठरले आहे, असे मत नागरिकांनी व्यक्त केले.