
सहसंपादक : रामभाऊ भोयर
हल्ली काम कमी अन् गोडबोलेपणा अधिक असा काही लोकप्रतिनिधींचा स्वभाव बनला आहे. आदिवासीबहुल राळेगाव मतदारसंघात विकासासाठी निधी प्रचंड आल्याचे चित्र उभे केले जात असले तरी, कामात कुठलीच गुणवत्ता नसल्याने या विकासाचा खेळखंडोबा झाला आहे. आता निवडणुकीत पुन्हा ही मंडळी मतदारांना भ्रमिष्ट कसे करता येईल, या मार्गी लागले आहेत.
राळेगाव तालुक्यात शेतीसिंचनाचा प्रश्न गंभीर आहे. काही प्रकल्पांच्या कालवे व इतर कामात बरीच अनागोंदी आहे. मुळात हा तालुका आदिवासीबहुल असल्याने आदिवासी विकासाचे प्रश्न सुटायला हवे होते. मात्र त्यावर खरे कामच झाले नाही. कापूस उत्पादक शेतकऱ्यांची अवस्था बिकट आहे. सोयाबीनला भाव नाही. त्यात काही योजनांच्या भरवश्यावर सत्ताधारी मते मागत आहेत. शहरात सांस्कृतिक सभागृहाचे काम गत दहा वर्षांपासून रखडले आहे. केवळ राजकीय श्रेयवादातून हे काम होऊ दिले नाही. आज ही इमारत धूळखात पडली आहे. सत्ताधाऱ्यांसह विरोधकही त्यावर गंभीर दिसत नाहीत. राष्ट्रीय महामार्गावर बाजारसमितीलगत तब्बल एक एकर जागेवर या इमारतीचे बांधकाम सुरू करण्यात आले. तत्कालीन मंत्री प्रा. वसंत पुरके यांच्या कार्यकाळात या इमारतीचे भूमिपूजन झाले होते. मात्र, नंतर प्रत्यक्ष बांधकामाला सुरुवात होऊनही हे बांधकाम अर्धवट राहिले. पुरके यांच्या पराभवानंतर आ. प्रा. डॉ. अशोक उईकेंनी खरे तर या शासकीय कामाला पूर्ण करणे अपेक्षित होते. मात्र त्यांनी या कामाकडे दुर्लक्ष केले. आज ही इमारत खंडहर झाली असून प्रेमी युगलांचा अड्डा बनली आहे. नगरपंचायतीवर त्या काळात
भाजपाची सत्ता होती. मात्र त्यांनी लक्षच दिले नाही. एका पदाधिकाऱ्याने स्वतःलाच सर्वस्वी मोठा समजून ते सभागृह पाडण्याचा पराक्रम केला. त्या जागेवर नवीन नगरपंचायत इमारत बांधली गेली. आता दुसऱ्यांदा निवडणूक होत आहे पण इमारतीच्या मुद्यावर कुणी बोलायला तयार नाहीत. पुरके यांच्या काळातील ही इमारत असल्याने त्यांना श्रेय जाऊ नये म्हणून सत्ताधाऱ्यांनी लक्ष दिले नसल्याची ओरड आहे.
विजयाचे दावे-प्रतिदावे
राळेगाव मतदारसंघात सत्ताधारी मतदारांना गृहित धरत आहेत. आपलाच विजय होईल, असा अतिआत्मविश्वास त्यांना आहे. मतदारसंघात बेरोजगारांच्या हाताला काम मिळेल, असा एकही उद्योग उभा झाला नाही. एमआयडीसीचा प्रश्न किती सुटला, हा संशोधनाचा विषय आहे. एकंदरीत मतदार मात्र आता मतदारनाच्या दिवशीच या सर्व बाबींचा हिशोब लावणार आहेत.
