अनेक वर्षांपासून कापसाचा भाव तोच, शेतकरी चिंतातूर,नेते निवडणुकीत मग्न, 9 वर्षापासून कापसाचा दर वाढेना, शेती करायची कशी?

सहसंपादक : रामभाऊ भोयर

दिवसेंदिवस शेती साहित्यासह खते, औषधी, मजुरी वाढत आहे. सोन्या चांदीची वाटचाल लाखाकडे सुरू आहे. जीवनावश्यक वस्तूंच्या किमती वाढत आहेत. दुसरीकडे मात्र, मागील अनेक वर्षांपासून पांढऱ्या सोन्याचा भाव ‘जैसे थे’च असल्याचे आकडेवारीवरून पुढे आले आहे.

सध्या नेते मंडळी निवडणुकीच्या आखाड्यात उतरले असून शेतकऱ्यांच्या प्रश्नाकडे कोणीही लक्ष द्यायला तयार नाही. सध्या

शेतकऱ्यांचा कापूस सोयाबीन निघाले असून शेतकरी आपला माल तोकड्या भावात विकत आहे. मागील दहा वर्षांपूर्वी केंद्र सरकारने शेतकऱ्याच्या पिकाला दुप्पट भाव देऊ म्हणून सांगितले होते मात्र दुप्पट भाव मिळण्याऐवजी उलट भाव कमी होवू लागले आहे.

सध्या सर्वत्र निवडणुकीची रणधुमाळी सुरू असून सर्वत्र नेते मंडळी निवडणुकीच्या आखाड्यात उतरले असून सध्यातरी नेते शेतकऱ्यांच्या भावा बाबत कोणीही बोलायला तयार नसल्याने होणाऱ्या निवडणुकीत जे शेतकऱ्यांच्या पिकांच्या भावाबाबत विचार करेल अशाच उमेदवाराला निवडून देवू असा विचार सध्या शेतकरी करतांना दिसत आहे. सन २०१३ पासून मधले एखादे वर्षे सोडले तर कापसाचे दर ९ हजाराच्या वरती गेले नाही. बारा वर्षांनंतरही कापूस त्यापेक्षाही कमी म्हणजे सहा ते सात हजार प्रतिक्विंटलमध्ये खरेदी केला जात आहे. यंदा तर हमी भावापेक्षा कमी दर मिळत असल्याने शेती करावी तर परवडत नाही सोडावी तर जगावे कसे असा प्रश्न तालुक्यातील शेतकरी उपस्थित करीत आहे. सन २०१३ पासून ते सन २०२४ या बारा वर्षांच्या काळात शेतमालाच्या हमीभावात शासनाने भाव वाढ केली असली, तरी ती भाव वाढ तोकडी आहे.

शिवाय खासगी बाजारात मालाचे भाव हमीभावापेक्षा कमी राहत आहेत. त्यावर शासनाचे नियंत्रण राहिलेले नाही. त्यामुळे शेतकऱ्यांची आर्थिक

परिस्थिती बिघडत चालली आहे. शेतमालाचे भाव आणि इतर वस्तूंची झालेली भाव वाढ यामुळे कमालीची तफावत आढळून येत आहे. त्यामुळे दिवसेंदिवस शेतकऱ्यांच्या जीवनात काळोख पसरत आहे. मागील बारा वर्षांच्या काळात शेतीसाठी लागणारे रासायनिक खत कीटकनाशकसह इतर वस्तूंच्या किमतीही तीन ते चार पट वाढल्या. परंतु, शेतीमालाचे भाव हमी भावापेक्षा कमी राहिले, तर कधी स्थिर राहिले. त्यामुळे शेतकऱ्यांपुढे शेती करण्याच्या अडचणी वाढत आहेत. शिवाय निसर्गामुळे उत्पादनालाही फटका बसत आहे.