
सहसंपादक : रामभाऊ भोयर
शेतमालाला भाव मिळत नसल्याने शेतकरी त्रस्त झाले आहे. सरकारची उदासीनता याला जबाबदार असून शेतकऱ्यांचा उत्पादन खर्चही निघणे मुश्कील झाले आहे. त्यांच्या मालाला योग्य भाव कधी मिळेल ? असा प्रश्न विचारण्यात येत आहे.अस्मानी सुलतानी संकटाचां सामना करीत शेतकरी शेती करतो. त्यातही शेतीउपयोगी खाद्यान्नाच्या किमती शिखरावर, मजुरीत दरात वाढ, वाहतुकीच्या खर्च करूनसुद्धा पिकविलेल्या मालाला कमी भावात बाजारात विकावे लागते. यामुळे त्यांच्यावर आर्थिक संकटाचां सामना करण्याची वेळ आली आहे.एकीकडे सल्फेट,युरिया आणि फवारणीच्या औषधांच्या किमतीत मोठी वाढ झाली आहे. तसेच मजुरीचे दर वाढले आहेत.वाहतुकीचा खर्च न परवडणारा तरीही कशी तरी शेती करून कुटुंबांचा उदरनिर्वाह सुरू आहे. तरीही शेतातील मालाला योग्य तो भाव मिळत नाही. नाइलाजाने शेतकऱ्यांना कमी किमतीत शेतमाल विकून आर्थिक नुकसान सहन करावे लागत आहे. शेतातील मालाला भाव मिळत नसल्याने शेतकऱ्यांसमोर शेती कशी करावी, असा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे. सरकारच्या धोरणामुळे शेतकऱ्यांवर अन्याय होत असून नापिकीमुळे शेतकरी कर्जबाजारी होत आहे. यातून आत्महत्येसारखा मार्ग शेतकरी स्वीकारू शकतात अशी अवस्था शेतकऱ्यांची झाली आहे.
शेतकरी हा जगाचा पोशिंदा आहे. परंतु हा पोशिंदाचं आता सरकारच्या शेतकरी विरोधी धोरणामुळे पुर्ण पणे आर्थिक संकटात सापडला आहे. तरुणांच्या हाताला काम नसल्यामुळे तरुण आता आपली वडिलोपार्जित शेती कसायला लागला आहे. त्यातही शेतमालाला भाव मिळत नसल्याने तो युवा शेतकरी पूर्णतः हतबल झाला आहे. शेतकरी हिताचे निर्णय घेऊन सरकारने शेतीला “अच्छे दिन” आणावे अशी आमची तरुण शेतकऱ्यांची मायबाप सरकारला मागणी आहे. नाहीतर युवा शेतकरी हतबल होऊन आत्महत्या सारखा टोकाचा निर्णय घेऊ शकतो.
प्रसाद कृष्णराव ठाकरे
करंजी (सो.) ग्रामपंचायत सरपंच तथा शेतकरी पुत्र
