

सहसंपादक : रामभाऊ भोयर
राळेगाव-जळका रस्त्याचे निकृष्ट दर्जाचे काम उघडकीस आल्याने संतप्त गावकऱ्यांनी काम बंद पाडले. पुलाच्या बांधकामात वापरलेले ढोले (काँक्रीट पाईप्स) छिद्रयुक्त व निकृष्ट दर्जाचे असल्याचे गावकऱ्यांच्या निदर्शनास आले. त्यामुळे कामकाजावर गावकऱ्यांनी आक्षेप घेत ठेकेदाराला जबाबदार धरले. या विषयी संबंधित कंत्राटदाराने ग्रामस्थांशी अरेरावी व उध्दट वागणूक दिल्याने वातावरण तापले, यावेळी जळका येथील गोविंदराव चहानकर, शेख रसूल, विठ्ठल कुमरे, भास्कर महाजन व इतर नागरिकांनी एकत्र येऊन निकृष्ट कामाबाबत निषेध व्यक्त केला. त्यांनी ठेकेदाराला तातडीने काम थांबवण्यास सांगितले आणि योग्य दर्जाचे साहित्य वापरूनच काम पुन्हा सुरू करण्याची मागणी केली.
तातडीने लक्ष देण्याची गरज !
गावकऱ्यांच्या म्हणण्यानुसार, सार्वजनिक कामात अशा प्रकारची हलगर्जीपणा सहन केली जाणार नाही. त्यांनी प्रशासनाकडेही कामाच्या चौकशीची मागणी केली आहे. निकृष्ट दर्जाचे काम स्वीकारणार नसल्याची भूमिका त्यांनी स्पष्ट केली आहे. या प्रकरणामुळे संबंधित रस्त्याचे काम सध्या थांबले असून, प्रशासन व संबंधित विभागाने याबाबत तातडीने लक्ष देण्याची गरज व्यक्त करण्यात येत आहे.
