आदिवासी विकास विभागाच्या विभागीय क्रीडा स्पर्धा यशस्वीरीत्या संपन्न, धारणीने पटकाविले विजेतेपद, दुसऱ्या स्थानी किनवट

सहसंपादक : रामभाऊ भोयर

आदिवासी विकास विभाग, महाराष्ट्र शासन अंतर्गत, आदिवासी विकास अप्पर आयुक्त कार्यालय, अमरावती यांच्या विद्यमाने आयोजित विभागीय क्रीडा स्पर्धा यंदा एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प कार्यालय, पांढरकवडा यांच्या वतीने राळेगाव येथील राजीव गांधी क्रीडा संकुलात २६ ते २८ डिसेंबर २०२४ दरम्यान आयोजित करण्यात आल्या.
स्पर्धेत २,४०० विद्यार्थी-विद्यार्थिनींनी सहभाग घेतला. कबड्डी, व्हॉलीबॉल, खो-खो, हॅण्डबॉल या सांघिक खेळांसह १४, १७ आणि १९ वयोगटातील धावण्याचे विविध प्रकार, थाळीफेक, गोळाफेक, भालाफेक, लांब उडी, उंच उडी असे वैयक्तिक क्रीडा प्रकारही घेण्यात आले.
धारणी प्रकल्पाने २१४ गुण मिळवत विजेतेपद पटकावले, तर किनवट प्रकल्पाने ११५ गुणांसह दुसऱ्या स्थानावर मजल मारली. छत्रपती संभाजीनगर प्रकल्प ७७ गुणांसह तिसऱ्या, पुसद ७२ गुणांसह चौथ्या, तर पांढरकवडा प्रकल्प ४७ गुणांसह पाचव्या स्थानी राहिला.
उद्घाटन व बक्षीस वितरण स्पर्धेचे उद्घाटन २६ डिसेंबर रोजी अमरावतीचे अप्पर आयुक्त जितेंद्र चौधरी यांच्या हस्ते झाले. महाराष्ट्र राज्याचे आदिवासी विकास मंत्री प्रा. डॉ. अशोक उईके यांचा मतदारसंघ असल्याने यंदा राळेगाव शहरात प्रथमच एवढ्या मोठ्या प्रमाणावर क्रीडा स्पर्धांचे आयोजन करण्यात आले.
माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग यांच्या निधनामुळे सांस्कृतिक कार्यक्रम आणि बक्षीस वितरण सोहळा रद्द करण्यात आला. मात्र, छोटेखानी कार्यक्रमात बक्षिसांचे वितरण करण्यात आले. या कार्यक्रमाला प्रकल्प अधिकारी मनोहर ओके, गोदाजी सोनार, सचिन राठोड व कार्यालय अधीक्षक उपस्थित होते.

स्पर्धेची यशस्वी आखणी करून एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प पांढरकवडाच्या वतीने मैदान समिती व इतर उपसमित्यांनी संयोजनाची जबाबदारी यशस्वीरित्या पार पाडली. स्पर्धा नियोजित वेळेत संपन्न होऊन निकाल समितीकडे सुपूर्द करण्यात आले.
स्पर्धेच्या यशस्वी आयोजनाबद्दल सर्वांच्या सहकार्याबद्दल प्रकल्प पांढरकवडाने आभार मानले. या स्पर्धेने आदिवासी विद्यार्थ्यांच्या क्रीडा कौशल्याला प्रोत्साहन मिळाले.