

सहसंपादक: रामभाऊ भोयर
राळेगाव येथील कला वाणिज्य महाविद्यालयाजवळ भीषण अपघातात एका तरुण अभियंत्याचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली. बोलेरो वाहनाने दुचाकीस्वारास धडक दिल्याने हा अपघात झाला.
मिळालेल्या माहितीनुसार, वैभव तुळशीदास ठाकरे (वय 23, रा. येवती, ता. राळेगाव) हा सावंगी मेघे, वर्धा येथे अभियांत्रिकीचे शिक्षण घेत होता. दि. 19 फेब्रुवारी 2025 रोजी तो घरी येण्यासाठी दुचाकीने प्रवास करत असताना संध्याकाळी 7:50 वाजताच्या सुमारास बोलेरो वाहन (क्रमांक MH 37T 1404) च्या चालकाने भरधाव वेगाने व निष्काळजीपणे वाहन चालवत त्याच्या दुचाकीला जोरदार धडक दिली. या अपघातात वैभव गंभीर जखमी झाला. त्याला तातडीने राळेगाव येथील सरकारी रुग्णालयात दाखल करण्यात आले, मात्र डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले.
या अपघाताची माहिती मिळताच वैभवचा काका उत्तम नथ्थुजी ठाकरे यांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. त्यांच्या तक्रारीवरून राळेगाव पोलीस ठाण्यात बोलेरो चालकाविरुद्ध भादंवि कलम 281, 125(A), 125(B), 106(1) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पोलीस स्टेशन राळेगाव करीत आहेत.
या घटनेमुळे येवती गावासह परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे. वैभव हा हुशार विद्यार्थी होता आणि त्याच्या आकस्मिक निधनाने कुटुंबावर दु:खाचा डोंगर कोसळला आहे.
