
.
शहरातील विज ही वारंवार का जात आहे ? याच्या चौकशी साठी फोन केला असता नागरिकांशी उर्मट व अश्लील भाषेत बोलणाऱ्या त्या महावितरणच्या अधिकाऱ्यावर कारवाईची मागणी ढानकी शहरातील नेतेमंडळीसह नागरिकांनी आज केलेली आहे.
सध्या उन्हाळ्याचे दिवस असल्याने उष्णतेपासून वाचण्यासाठी नागरिकांना कुलर व पंख्याचा आसरा घ्यावा लागतो. मात्र एन दुपारच्या वेळीच वीज पुरवठा खंडित होत असल्याने उष्णतेमुळे नागरिकांचे प्रचंड हाल होत आहेत. वारंवार वीज पुरवठा खंडित का होत आहे याची चौकशी करण्यासाठी महावितरण अधिकाऱ्याशी फोन केला असता ते नागरिकांना अतिशय खालच्या दर्जाच्या भाषेत बोलत असल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे. त्यातच भर म्हणजे आज शहरातील एका प्रतिष्ठित व्यक्तीने त्या अधिकाऱ्याला फोन केला असता तो अधिकारी त्याच पद्धतीने बोलला. ही बाब शहरात वाऱ्यासारखी पसरली आणि संतप्त नागरिकांनी गाव पुढाऱ्यासह महावितरण कार्यालय गाठले. नागरिक कार्यालयात येत असल्याची भनक लागल्याने त्या अधिकाऱ्याने आधीच पलायन केले होते. यावेळी जमलेल्या नागरिकांनी त्या अधिकाऱ्याच्या कार्यालयाजवळ उभे राहून घोषणाबाजी केली व त्या उर्मट अधिकाऱ्यावर कारवाईची मागणी करण्यात आली. यावेळी कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी सभापती बाळासाहेब चंद्रे पाटील, भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे शहराध्यक्ष अमोल तुपेकर, उपनगराध्यक्ष जहीर जमीनदार, भाजपाचे शहराध्यक्ष महेश पिंपरवार, मनसेचे तालुकाअध्यक्ष शेख सादिक, आझाद समाज पार्टीचे जिल्हाध्यक्ष जोन्टी विनकरे, युवा सेनेचे तालुकाप्रमुख संभाजी गोरटकर, शिवसेनेचे शहराध्यक्ष कांता वासमवार, शिवसेना माजी शहर प्रमुख बंटी जाधव, गणेश नरवाडे, रमेश गायकवाड, गोलू मुनेश्वर, निरंजन नलगे, व शहरातील इतर नागरिक उपस्थित होते. त्या उर्मट अधिकाऱ्यावर महावितरण प्रशासन कोणती कारवाई करते याकडे नागरिकांचे लक्ष लागून आहे.
