
सहसंपादक : रामभाऊ भोयर
सैनिक पब्लिक स्कूल, वडकी येथील विद्यार्थ्यांनी महाराष्ट्र परीक्षा परिषद, पुणे द्वारे घेण्यात आलेल्या पूर्व उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षेत उल्लेखनीय यश संपादन करून शाळेचे नाव उज्ज्वल केले आहे. ही परीक्षा गुणवत्ताधारित असून, राज्यातील पाचवी व आठवीच्या विद्यार्थ्यांसाठी दरवर्षी घेतली जाते.
या परीक्षेत सैनिक पब्लिक स्कूलच्या इयत्ता ५ वीचे १६ आणि इयत्ता ८ वीचे ५ असे एकूण २१ विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला होता. या विद्यार्थ्यांनी मेहनत, चिकाटी आणि शाळेतील गुणवत्तापूर्ण शिक्षणाच्या जोरावर परीक्षेत उत्तम कामगिरी केली आहे. विशेष म्हणजे, इयत्ता ५ वीतील पाच विद्यार्थी शिष्यवृत्तीसाठी पात्र ठरले आहेत.
शिष्यवृत्तीस पात्र ठरलेल्या विद्यार्थ्यांची नावे पुढीलप्रमाणे आहेत –
१) देवांजना नरेंद्र खांदनकर
२) ग्रीष्मा राजू पिसुर्डे
३) मंथन मनोज मानकर
४) श्रव्या वाघमारे
५) सक्षम कोवले
या सर्व विद्यार्थ्यांचे विशेष अभिनंदन करण्यात येत आहे. त्यांच्या या यशामध्ये शाळेतील शिक्षकवृंद, पालकवर्ग यांच्यासह संपूर्ण संस्थेचा मोठा वाटा आहे. गुणवत्तापूर्ण शिक्षण, सतत मार्गदर्शन आणि विद्यार्थ्यांवर घेतलेली वैयक्तिक जबाबदारी यामुळे हे यश शक्य झाले आहे.
शाळेचे प्राचार्य श्री. सचिन ठमके (सीबीएसई रिसोर्स पर्सन) यांनी विद्यार्थ्यांचे कौतुक करताना सांगितले की, “शिष्यवृत्ती परीक्षेसाठी विद्यार्थ्यांनी सातत्याने मेहनत घेतली. त्यांच्या यशामुळे संपूर्ण शाळेचा आत्मविश्वास वाढला आहे.”
संस्थेचे सचिव श्री. सत्यवान सिंग दुहन आणि संस्था समितीचे अध्यक्ष श्री. रणधीर सिंग दुहन यांनी देखील विद्यार्थ्यांचे अभिनंदन करताना शाळेच्या गुणवत्तापूर्ण शिक्षणपद्धतीची प्रशंसा केली. पुढील काळात अजून अधिक विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती तसेच बाकी परीक्षा मधे यश मिळत राहण्याचा निर्धारही त्यांनी व्यक्त केला.
या यशामुळे सैनिक पब्लिक स्कूल, वडकी या शाळेने शिष्यवृत्ती परीक्षेत आपली गुणवत्ता सिद्ध केली असून, ग्रामीण भागातही दर्जेदार शिक्षण देणारी संस्था म्हणजे सैनिक पब्लिक स्कूल आहे, हे पुन्हा एकदा अधोरेखित केले आहे.
विद्यार्थ्यांच्या या यशामुळे संपूर्ण परिसरात त्यांचे कौतुक होत आहे..
