
हवामान खात्याने मागील वर्षी पेक्षा या वर्षी जास्त पाऊस पडेल व यावर्षी आठ ते दहा दिवसापूर्वी आधीच पावसाचे आगमन होईल असा अंदाज दिला होता त्यानुसार मे महिना तर पाऊस पडलाच या घाईने तालुक्यातील शेतकऱ्यानी शेती मशागतीची कामे आटोपून मृग नक्षत्रा पासून शेतात पेरणी केली त्यानंतर पावसाच्या हलक्या सरी आल्या असल्याने पेरलेले बियाणे जमिनीत कुजले असून शेकडो शेतकऱ्यांवर दुबार पेरणीचे संकट घोंघावत आहे. यामुळे शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे. आकाशात ढग मृग नक्षत्रापासून आठ दिवस होवूनही उन्हाचा उकाडा मोठ्या प्रमाणात असल्याने घामाच्या धारा निघत आहे. पाऊस नको असताना मे महिन्यात दररोज येऊन शेतकऱ्याचे अतोनात नुकसान केले आणि आता खरिपाच्या पिकाची पेरणीची वेळ केली असताना चक्क सूर्य आग ओकत असून अंगाची लाही लाही होत आहे शेतकरी आभाळाकडे दररोज बघत असतो पावसाचे ढग येतेय मात्र ते कोठे गायब होते तेच कळेनासे झाले आहे त्यामुळे शेतकरी चिंतेत पडला आहे.
शेतकऱ्यांनी हवामानाच्या अंदाजानुसार केली पेरणी
यावर्षी मागील वर्षी पेक्षाही जास्त पाऊस पडेल व तोही आठ ते दहा दिवसा पूर्वी पडण्याचा अंदाज वर्तविला होता त्यानुसार शेतकऱ्यांनी मृगाच्या सुरुवातीलाच पेरणी केली व पेरणी केल्यानंतर पावसाच्या हलक्या सरी आल्याने व मृग नक्षत्राने सुरुवातीपासूनच दडी मारल्याने शेतकऱ्यांवर दुबार पेरणीचे संकट ओढवले आहे.
बियाणे भावात झाली वाढ
शेतकऱ्यांच्या शेतमालाला भाव मिळो ना मिळो पण शेतीला उपयोगी असणारे बियाणे खते यांचे भाव नेहमी गगनाला भिडलेले असतात आधीच पावसाने दडी मारल्यामुळे शेतकऱ्यांवर दुबार पेरणीचे संकट आले आहेत पिकांना लागणाऱ्या रासायनिक खताचे भाव दीडशे ते दोनशे तसेच बियाण्याचे भाव पन्नास रुपये वाढल्याने शेतकऱ्यांची आर्थिक कोंडी झाली आहे एकीकडे निसर्ग पाठ फिरवतो तर दुसरीकडे खताचे भाव शेतकऱ्यांच्या मानगुटीवर बसत आहेत त्यामुळे शेतकऱ्यांवरील कर्जाचा डोंगर वाढतच आहे.
