

सहसंपादक : रामभाऊ भोयर
राज्य शासनाने शासकीय कर्मचाऱ्यांसाठी पाच दिवसांचा आठवडा लागू केल्यानंतरही अनेक कार्यालयांत शिस्तीचा अभाव दिसून येतोय. सोमवारी (दि. २१ जुलै) सकाळी राळेगाव येथील कृषी कार्यालयात याचे जिवंत उदाहरण पाहायला मिळाले.कार्यालय सकाळी ९.४५ वाजता सुरू होण्याची वेळ असतानाही १०.१० वाजेपर्यंत बहुतांश कर्मचारी गैरहजर होते. एका कर्मचाऱ्याला कार्यालयाबाहेर बेंचवर बसलेले पाहायला मिळाले, मात्र कार्यालयात केवळ एकच कर्मचारी उपस्थित होता. उर्वरित सगळे अदृश्य!
शासनाच्या निर्णयानुसार पाच दिवसांचा आठवडा लागू करताना रोजच्या कामकाजाच्या वेळेत ४५ मिनिटांची वाढ करण्यात आली असून, सकाळी ९.४५ ते सायंकाळी ५.४५ या वेळेत उपस्थिती बंधनकारक आहे. मात्र, राळेगाव कृषी कार्यालयात ही अंमलबजावणी कागदावरच दिसते.
शिस्तीची वाट लागली?
कर्मचाऱ्यांनी वेळेचे भान ठेवावे आणि नागरिकांच्या अपेक्षांची पूर्तता करावी, अशी अपेक्षा असताना, प्रत्यक्षात मात्र बेफिकिरीचे दृश्य पाहायला मिळाले. याकडे वरिष्ठ अधिकाऱ्यांनी लक्ष देणे अत्यावश्यक आहे, अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे.
