
सहसंपादक : रामभाऊ भोयर
“सातबारा कोरा करा – दिलेला शब्द पाळा” या मागणीसाठी संपूर्ण महाराष्ट्रभर सुरु झालेल्या रास्ता रोको आंदोलनाचा भाग म्हणून राळेगाव आणि वाढोणा (बाजार) येथे आज शांततेत चक्काजाम आंदोलन पार पडले. आंदोलनात सर्वपक्षीय नेत्यांनी व कार्यकर्त्यांनी सहभाग घेतला.प्रहार जनशक्ती पक्षाचे अध्यक्ष व माजी राज्यमंत्री बच्चू कडू यांच्या नेतृत्वाखाली शेतकऱ्यांच्या हक्कासाठी लढा अधिक तीव्र करण्यात येत आहे. त्यांनी यापूर्वी गुरुकुंज मोझरी येथे सात दिवस अन्नत्याग आंदोलन करून सरकारकडून आश्वासन मिळवले होते. परंतु, अद्याप त्या आश्वासनांची पूर्तता न झाल्याने संतप्त शेतकऱ्यांनी आता रस्त्यावर उतरण्याचा निर्णय घेतला.
शेती संकट, शेतकऱ्यांच्या आत्महत्या, आदानी-अंबानीसारख्या धनाढ्यांच्या हातात शेती जाण्याची भीती, तसेच धनगर, मेंढपाळ, मच्छीमार, दिव्यांग, वंचित व कष्टकरी वर्गाच्या प्रश्नांवर सरकारकडून दुर्लक्ष होत असल्याच्या पार्श्वभूमीवर हे आंदोलन झाले.राळेगाव येथे वसंत जिनिंगजवळील राष्ट्रीय महामार्ग क्रमांक १३३ वर सकाळपासूनच शेकडो आंदोलक जमले. “जय जवान जय किसान”, “सातबारा कोरा करा”, “दिल्लीतून निर्णय नको – शेतकऱ्यांचा हक्क द्या” अशा घोषणांनी परिसर दणाणून गेला. काही काळ वाहतुकीवर परिणाम झाला, मात्र आंदोलन पूर्णपणे शांततेत पार पडले.
या आंदोलनाला राळेगाव पोलीस प्रशासनानेही सकारात्मक सहकार्य केले.
यावेळी प्रहार जनशक्ती पक्षाचे तालुकाध्यक्ष संजय दुरबुडे, राष्ट्रवादी शरद पवार गटाचे तालुका अध्यक्ष दिलीप कन्नाके, शिवसेना (उद्धव ठाकरे गट) जिल्हा उपाध्यक्ष विनोद काकडे, नगरसेवक मधुकर राजूरकर, सैय्यद लियाकत अली, राहुल बहाळे, चंद्रकांत झाडे, शाम धुर्वे, दिनेश करपते, शेखर आंबाखाये, प्रमोद अमृतकर, जितेंद्र कहूरके, मधुकर पावले, प्रमोद ढाले, सुनील फटिंग, बादल देवतळे, प्रदीप गुजूरकर, किशोर गलाट, विष्णू तोडासे, प्रवीण काकडे, रमेश पेदांम, संतोष तेलंगे, विलास देशमुख, अण्णा आंजीकर, प्रफुल आत्राम, संजय भोरे, रुपेश कोठारी, नितीन कोमेरवार, लिहास आगलावे यांच्यासह अनेक कार्यकर्ते उपस्थित होते.
