सहसंपादक : रामभाऊ भोयर
शेतकऱ्यांना शेतातील पिकांविषयी वेळोवेळी योग्य मार्गदर्शन मिळावे यासाठी शासनाने कृषी सहाय्यकाची नेमणूक केली खरी, परंतु नियुक्त केलेल्या कृषीसहायकांकडून सर्वसामान्य शेतकर्यांना आवश्यक ते मार्गदर्शन मिळतच नसल्याने शेतकऱ्यांनी कृषी सहाय्यक विषयी नाराजी व्यक्त केली असून हे कृषी सहाय्यक नियुक्त केलेल्या नियमित गावात किंवा मुख्यालयाच्या ठिकाणी वेळोवेळी येतच नसल्याने शेतकऱ्यांना अडचणीला समोर जावे लागत आहे तसेच तालुक्यातील बहुतांश कृषी सहाय्यक मुख्यालयी न राहता तालुक्याच्या तर काही कृषी सहाय्यक जिल्ह्याच्या येथून कारभार हाकलत असल्याने कृषी सहाय्यकाचे अपडाऊन शेतकऱ्यांसाठी डोकेदुखी ठरली आहे.
शासन कोट्यवधी खर्च करुन शेतकर्यांसाठी विविध योजना अंमलात आणत असल्या तरी या योजनांची माहिती कृषी सहाय्यक शेतकर्यांपर्यंत पोहचवत नसल्याचे चित्र आहे. त्यामुळे योजनांच्या उद्देशालाच हरताळ फासण्याचे काम तालुक्यात सर्वदूर होत असल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे. कृषी विभाग व शेतकरी यांच्यातील दुवा म्हणजे कृषी सहाय्यक आहेत. ग्रामीण भागातील शेतकर्यांना शेतीविषयी योग्य सल्ला, मिळावा, शासनाच्या योजनांची माहिती मिळावी, शेतकर्यांसाठीच्या योजना योग्य प्रकारे राबविण्यात येत आहेत की नाही, याची वेळोवेळी तपासणी करण्यात यावी, या उद्देशाने कृषी विभागाने कृषी सहाय्यकांची नेमणूक केलेली आहे. ही सर्व जबाबदारी पार पाडण्यासाठी कृषी सहाय्यकांनी नेमून दिलेल्या गावी म्हणजेच मुख्यालयी राहणे बंधनकारकसुद्धा करण्यात आले आहे. गावामध्ये राहून शेतकर्यांच्या गाठीभेटी घेणे, त्यांना शेतीविषयक योग्य मार्गदर्शन करणे, शासनाच्या विविध योजनांची विस्तृत माहिती देणे, पिकांविषयी विस्तृत माहिती देणे आदी कामे कृषी सहाय्यकांनी करणे अपेक्षित आहे. मात्र तालुक्यातील बहुतांश कृषी सहाय्यक या शासकीय आदेशाची पायमल्ली करत आहेत.
कृषी सहाय्यक नियुक्त गावांमध्ये आठवडयातून एखादी दिवस भेट देतात तर काही कृषी सहाय्यकाचे महिन्यातून एखादी दिवसच दर्शन होत असते. त्यामुळे कृषी सहाय्यक नियमित गावांमध्ये येत नसल्याने शेतकर्यांना अनेक अडचणींचा सामना करावा लागतो. विशेष म्हणजे काही कृषी सहाय्यक केवळ आपल्या मर्जीतील शेतकर्यांपर्यंतच या योजनांचा लाभ कसा पोहचवता येईल, यासाठी हे कृषी सहाय्यक प्रयत्न करताना दिसतात. मर्जीतील शेतकर्यांना शासकीय योजनांचा लाभ मिळवुन देण्याच्या दलालीतुन अनेक कृषी सहाय्यक मोठी मलाई मिळवत असल्याची चर्चा ऐकावयास मिळत आहे.
तेव्हा वरिष्ठ अधिकारी या बाबीकडे वेळी लक्ष देणे गरजेचे आहे.तसेच खरीप हंगामाच्या पार्श्वभूमीवर शेतकर्यांना मार्गदर्शन न करणार्या व मुख्यालयी न राहणार्या कृषी सहाय्यकांवर कडक कारवाई करण्याची मागणी शेतकऱ्यांकडून केली जात आहे.
