
सहसंपादक: रामभाऊ भोयर
गुढीपाडव्याचा सण अवघ्या दोन तीन दिवसावर असला, तरी शेतकऱ्यांना अद्याप सालगडी मिळालेले नाहीत. गुढीपाडव्याच्या सणाच्या पंधरा दिवसापूर्वी पासूनच सालगडी शोधण्यात सदन शेतकरी धावपळ करीत असतो परंतु आज-काल शेतीची कामे कुणालाही नकोसे वाटत असल्याने सालगडी मिळणे कठीण झाले असून शेतकऱ्यांना अद्यापही सालगडी मिळालेले नाहीत त्यामुळे सालगड्यांचा शोध सुरू आहे.
गुढीपाडवा हा पारंपरिकदृष्ट्या शेतीसाठी नवीन सालगडी ठरविण्याचा महत्त्वाचा सण मानला जातो. मात्र, मजुरांच्या वाढत्या अपेक्षा, रोख पैशांची मागणी आणि शेतीतील श्रमप्रधान कामांमुळे ग्रामीण भागातील शेतकरी हैराण झाले आहेत. पूर्वी धान्य स्वरूपात मोबदला घेतले जाणारे सालगडी आता १ लाख ते दीड लाख रुपये देऊनही मिळत नसल्याचे चित्र तालुक्यात आहे.
दिवसेंदिवस सालगड्यांची संख्या झपाट्याने घटत आहे. ग्रामीण भागातील मजूर आता रोहयो, वीटभट्टी, बांधकाम, दुकान, बार-हॉटेल आणि मोठ्या शहरांतील कारखान्यांकडे वळले आहेत. वर्षभर शेतीकामात अडकण्याऐवजी अधिक कमाईच्या संधी शोधण्याकडे त्यांचा कल दिसून येतो. यामुळे पारंपरिक शेतीव्यवस्था डगमगण्याची भीती शेतकऱ्यांना वाटत आहे. सालगडी मिळत नसल्याने मोठ्या शेतकऱ्यांची अडचण होत असल्याचे पहावयास मिळत आहेत. सालगड्यांच्या सर्व मागण्या पूर्ण करण्यावर भर दिला जातो.
सालगड्याचा पगार गेला लाखाच्या वर
शेतीतून मिळणारे उत्पन्न कमी आणि शेतीसाठी करावा लागणार खर्च अधिक, यामुळे शेतकरी दुहेरी अडचणीत सापडला आहे. यंदा सालगड्याचा पगार एक लाखापर्यंत गेला आहे. तालुक्यातील बऱ्याच गावांमध्ये स्थानिक पातळीवर सालगडी मिळत नसल्याने इतर बाहेर गावावरून सालगडी शोधून आणण्याचे काम शेतकऱ्यांना करावे लागत आहे. यामुळे शेतकऱ्यांची सालगडी शोधताना मोठी दमछाक होत आहे.
मानसिकतेत झाला बदल
सालगडी म्हणून गुंतून राहण्यापेक्षा अनेकजण बांधकाम, वीटभट्टी, ऊसतोडणी, मंदिर बांधकाम, बार अॅण्ड रेस्टॉरंटमध्ये कामगार म्हणून जातात. येथे अधिक कमाई होत असल्याने ग्रामीण भागातील शेतमजूर शहराकडे वळले आहेत. त्यामुळे सालगडी मिळणे सध्या शेतकऱ्यांसमोरील एक मोठे आव्हान ठरत आहे.सालगडी मिळत नसल्याने शेतकरी आपली शेती बटाईने देण्यावर भर देत आहेत. यावर्षात गुढीपाडवा जवळ आला तरी सालगडी मिळत नसल्याने शेतकऱ्यांपुढे दुहेरी संकट उभे ठाकले आहे. अनेक शेतकरी सालगड्याच्या शोधात भटकत आहेत. यात सालगड्यांचे दर शेतकऱ्यांसाठी आर्थिक दृष्ट्या परवडेनासे झाले आहे.
सरकार मोफत योजनांची खिरापत वाटप करीत आहे. त्यामुळे शेतात कुणाचीही काम करण्याची इच्छा राहिली नाही. काम केलेच तर अव्वाच्या सव्वा मजुरीची मागणी केली जाते.निसर्गाच्या लहरीपणाचा फटका शेतीला बसत असताना आता सालगडी मिळणे अवघड बनत चालले आहे. सालगड्यांचे दर देखील आता आवाक्याबाहेर जात आहे. त्यामुळे शेती व्यवसाय अडचणीत यायला लागला आहे.
