
सहसंपादक : रामभाऊ भोयर
वर्धा शहरातील स्नेहलनगर येथील रहिवासी आणि जानकीदेवी बजाज विज्ञान महाविद्यालय तसेच न्यू इंग्लिश हायस्कूलचे माजी विद्यार्थी सहाय्यक पोलिस आयुक्त नरेंद्र कृष्णराव हिवरे यांची उल्लेखनीय व प्रशंसनीय सेवेसाठी राष्ट्रपती पोलिस पदकासाठी निवड करण्यात आली आहे. त्यांच्या तीन दशकांहून अधिकच्या सेवेत केलेल्या कामगिरीची दखल घेत हा सन्मान जाहीर झाला असून, वर्धा जिल्ह्यासाठी ही अभिमानाची बाब ठरली आहे.
नरेंद्र हिवरे यांनी १९९३ मध्ये महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत पोलिस उपनिरीक्षक म्हणून सेवेत प्रवेश केला. सेवेत आल्यानंतर त्यांनी नक्षलग्रस्त गडचिरोली, चंद्रपूर, गोंदिया, भंडारा, नागपूर ग्रामीण व नागपूर शहर अशा संवेदनशील व जबाबदारीच्या विभागांमध्ये कार्य केले. या काळात विविध पदांवर कार्यरत राहून त्यांनी ३५६ हून अधिक पुरस्कार व सन्मान मिळवले आहेत.
त्यांच्या उल्लेखनीय कामगिरीत २००४ मध्ये तिहेरी खुनाचा उत्कृष्ट तपास, २०१८ मध्ये ‘इनसिग्निया’ पुरस्कार, तसेच २०२० मध्ये भारताचे गृहमंत्री यांच्या हस्ते राज्यातील उत्कृष्ट तपासी अधिकारी म्हणून पदक व प्रशस्तीपत्राचा मान मिळवणे यांचा समावेश आहे. कोरोना महामारीच्या काळातही त्यांनी केलेल्या कार्याची दखल घेत त्यांना विशेष सन्मान देण्यात आला होता.
नागपूर शहरात सहाय्यक पोलिस आयुक्त पदावर कार्यरत असलेल्या हिवरे यांचे नाव धाडसी, प्रामाणिक आणि परिणामकारक तपास अधिकारी म्हणून ओळखले जाते. त्यांच्या कार्यकौशल्यामुळे अनेक गुन्ह्यांचे यशस्वी निराकरण झाले असून, गुन्हेगारांना न्यायाच्या कक्षेत आणण्यात ते नेहमीच पुढे राहिले आहेत.
त्यांचे मोठे बंधू औद्योगिक संघटनेचे अध्यक्ष प्रवीण हिवरे असून, नरेंद्र हिवरे यांच्या या यशामुळे वर्धा जिल्ह्यात आनंदाचे व अभिमानाचे वातावरण निर्माण झाले आहे.
