

सहसंपादक : रामभाऊ भोयर
राखड घेऊन जाणाऱ्या भरधाव ट्रकने प्रवासी ऑटोला जबर धडक दिल्याने झालेल्या भीषण अपघातात एकाचा घटनास्थळीच मृत्यू झाला.तर चार जण गंभीर जखमी झाल्याची घटना तालुक्यातील वडकी ते खैरी मार्गावरील ऋषी जिनिंगसमोर आज सोमवार दिनांक 8 सप्टेंबर रोजी सकाळी साडेदहाच्या दरम्यान घडली.वडकी ते खैरी हा अत्यंत वर्दळीचा मार्ग आहे. या मार्गावरून भरधाव वाहतूक होत असल्याने मोठ्या प्रमाणात अपघात घडतात. दरम्यान खैरी येथून ( एम.एच.२९ व्ही ८३९४) या क्रमांकाचा ऑटो प्रवाशी घेऊन वडकीकडे येत होता. याच दरम्यान वरोरा येथून राखड घेऊन येणाऱ्या एम एच ४० सी डी १९८९ क्रमांकाच्या ट्रकने ओव्हरटेक करण्याच्या प्रयत्नात ऑटोला मागाहून जोराची धडक दिली. त्यामुळे ऑटो वेगाने समोर गेला. या भीषण अपघातात ऑटो रस्त्याच्या कडेला जाऊन पडला.
ऑटोतील प्रवासी रस्त्यावर फेकल्या गेले. या अपघातात एका इसमाला आपला जीव गमावा लागला आहे. तर चार प्रवासी गंभीर जखमी झाले आहे.यामध्ये शंकरराव पारखी (५२) रा.आष्टोना असे अपघातात ठार झालेल्या इसमाचे नाव आहेत.तर लता चंद्रभूषण जयस्वाल (५३) रा,खैरी, बेबीबाई नारायण शिरसागर (४८) रा,खैरी, दुर्गा विनोद धोत्रे (३८) रा,खैरी,ताई शंकरराव इंगोले (४५) रा,कोच्ची हे गंभीर जखमी झाले आहेत. या अपघाताची माहिती मिळताच वडकी पोलिस स्टेशनचे ठाणेदार सुखदेव भोरकडे,पीएसआय प्रकाश देशमुख यांचेसह बीट जमादार अमोल चौधरी, संदीप मडावी, दीपक वांड्रस्वार,निरंजन खिरटकर,अंकुश पाथोडे यांनी लगेच घटनास्थळावर धाव घेत अपघातातील गंभीर जखमींना उपचारार्थ रुग्णवाहिकेतून वडणेर रुग्णालयात पाठवले.तर मृतदेह उत्तरीनिय तपासणीसाठी रुग्णालयात पाठविण्यात आला आहे. या अपघातामुळे रस्त्यावरील वाहतूक विस्कळीत झाली होती. पोलिसांनी अपघातग्रस्त वाहने बाजूला करून वाहतूक सुरळीत केली. अपघातातील ट्रकचालक व ऑटो चालक घटनास्थळावरुन फरार झाले असून पोलीस त्याचा शोध घेत आहेत.या घटनेचा पुढील तपास वडकी पोलीस स्टेशन करीत आहेत.