
सहसंपादक : रामभाऊ भोयर
महाविद्यालयात दि. २२ सप्टेंबर २०२५ रोजी भारतरत्न डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्या स्मृतिदिनानिमित्त विशेष व्याख्यान कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान डॉ. ए. वाय. शेख यांनी भूषविले तर मार्गदर्शन श्री. प्रीतेश कुडसंगे यांनी केले.
कार्यक्रमाची प्रस्तावना रासेयो कार्यक्रम अधिकारी श्री. स्वप्नील गोरे यांनी केली. त्यांनी डॉ. राधाकृष्णन यांच्या जीवनकार्याचा थोडक्यात परिचय देत कार्यक्रमाची रूपरेषा स्पष्ट केली.
या व्याख्यानात डॉ. राधाकृष्णन यांचे शिक्षक म्हणून योगदान, तत्त्वज्ञानातील भूमिका तसेच राष्ट्रपतीपदाच्या कार्यकाळातील कार्य यांचा सविस्तर आढावा घेण्यात आला. त्यांच्या कार्यातून विद्यार्थ्यांमध्ये आदर्श शिक्षकाचे महत्त्व, ज्ञानार्जनाची ओढ व चारित्र्यनिर्मितीची दिशा अधोरेखित करण्यात आली.
अध्यक्षीय भाषणात डॉ. ए. वाय. शेख यांनी विद्यार्थ्यांना डॉ. राधाकृष्णन यांच्या जीवनातून प्रेरणा घेऊन सदाचार, प्रामाणिकपणा व सामाजिक बांधिलकी जोपासण्याचे आवाहन केले. तर मार्गदर्शनपर भाषणात श्री. प्रीतेश कुडसंगे यांनी डॉ. राधाकृष्णन यांच्या तत्त्वज्ञानातील वैशिष्ट्ये स्पष्ट करून शिक्षक हा केवळ अध्यापक नसून विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण व्यक्तिमत्व घडविणारा मार्गदर्शक असतो, यावर भर दिला. कार्यक्रमात महिला कार्यक्रम अधिकारी कु. भाग्यश्री लोहकर, सर्व विभाग प्रमुख, प्राध्यापक, रासेयो स्वयंसेवक व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. संपूर्ण कार्यक्रम उत्साहात आणि यशस्वीरीत्या पार पडला.
