

सहसंपादक : रामभाऊ भोयर
राळेगाव तालुक्यातील शेतकऱ्यांच्या विविध न्याय मागण्यांसाठी भारतीय राष्ट्रीय काँग्रेसच्या वतीने सोमवारी भव्य ‘जन आक्रोश मोर्चा’ काढण्यात आला. तालुक्यातील हजारो शेतकरी, शेतमजूर आणि नागरिकांच्या उपस्थितीत हा मोर्चा शहरातील मुख्य मार्गाने जल्लोषात मार्गक्रमण करीत तहसील कार्यालयावर धडकला.
मोर्चाचे नेतृत्व जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष ऍड. प्रफुल्ल मानकर, माजी मंत्री प्रा. वसंत पुरके, माजी मंत्री शिवाजीराव मोघे, तसेच काँग्रेस ओबीसी सेलचे जिल्हाध्यक्ष अरविंद वाढोनकर यांनी केले.
मोर्चात सहभागी कार्यकर्त्यांनी “शेतकऱ्यांना न्याय द्या”, “दुष्काळग्रस्त घोषित करा”, “कर्जमाफी करा” अशा घोषणांनी परिसर दुमदुमून टाकला.
शेतकऱ्यांच्या मागण्या
तहसीलदार यांना देण्यात आलेल्या निवेदनात काँग्रेसने खालील महत्त्वाच्या मागण्या केली —
राळेगाव तालुक्याला तत्काळ दुष्काळग्रस्त घोषित करावे.
शेतकऱ्यांना संपूर्ण कर्जमाफी जाहीर करावी.
नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना हेक्टरी ५० हजार रुपये अनुदान द्यावे.
शेतमजुरांना रोजगार उपलब्ध करून द्यावा.
शेतकऱ्यांना सरसकट विमा संरक्षण द्यावे.
सोयाबीनला ७,००० रुपये व कापसाला १०,००० रुपये प्रति क्विंटल हमीभाव द्यावा.
अतिक्रमित जागेवरील लाभार्थ्यांना घरकुलाचे पट्टे द्यावेत.
पांदण रस्ते व कृषी पंपांच्या वीजजोडणीची कामे तात्काळ सुरू करावीत.
जंगली जनावरांच्या त्रासावर उपाययोजना करून पिकांच्या नुकसानीची भरपाई द्यावी.
मोर्चात मान्यवरांची उपस्थिती
या मोर्चात अल्पसंख्यांक आघाडीचे जिल्हाध्यक्ष जाफर शेख, तालुका काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष राजेंद्र तेलंगे, शहराध्यक्ष प्रदीप ठुने, खरेदी विक्री संघाचे सभापती मिलिंद इंगोले, वसंत जिनिंगचे सभापती नंदकुमार गांधी, जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या संचालिका वर्षा तेलंगे, नगराध्यक्ष रवींद्र शेराम, ग्राविक अध्यक्ष सचिन हुरकुंडे, खरेदी विक्री संघाचे उपसभापती भरत पाल, वसंत जिनिंग उपसभापती अंकुश रोहनकर, सरपंच संघटनेचे तालुकाध्यक्ष अंकुश मुनेश्वर, किसान काँग्रेस तालुकाध्यक्ष श्याम येनोरकर, ऍड. सीमा तेलंगे, प्रकाश पोपट, सुधीर जवादे आदी मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते.
या जनआक्रोश मोर्चाच्या माध्यमातून काँग्रेसने राज्य सरकारकडे शेतकऱ्यांच्या जळत्या प्रश्नांकडे गांभीर्याने लक्ष देण्याची मागणी केली असून, मागण्यांकडे दुर्लक्ष झाल्यास पुढील काळात तीव्र आंदोलन छेडण्याचा इशाराही यावेळी देण्यात आला.
