
सहसंपादक :: रामभाऊ भोयर
राळेगाव तालुक्यातील पंचायत समिती सभापती पदाचे आरक्षण यंदा अनुसूचित जमाती (महिला) प्रवर्गासाठी जाहीर झाले असून, या निर्णयामुळे अनेक राजकीय इच्छुकांच्या अपेक्षांवर पाणी फिरले आहे.
भाजप व काँग्रेससह विविध पक्षांतील अनेक इच्छुक गेली दोन-तीन वर्षे या पदासाठी तयारी करत होते. विशेष म्हणजे, काँग्रेसमधून भाजपमध्ये प्रवेश घेतलेल्या काही नेत्यांचा देखील या आरक्षणामुळे हिरमोड झाला आहे. आता एकमेव जळका गण अनुसूचित जमाती महिला प्रवर्गासाठी राखीव असल्याने, सक्षम व तगड्या महिला उमेदवाराला मैदानात उतरवण्यासाठी सर्वच पक्ष प्रयत्नांची पराकाष्ठा करणार आहेत. त्यामुळे येथील निवडणूक सर्वाधिक चुरशीची होण्याची चिन्हे आहेत.
खैरी व धानोरा गणातून उपसभापती पदावर नजर खैरी आणि धानोरा हे दोन्ही गण सर्वसाधारण प्रवर्गासाठी आरक्षित झाल्याने, येथून निवडून येणारा उमेदवार पंचायत समिती उपसभापती पदासाठी प्रबळ दावेदार ठरण्याची शक्यता आहे. त्याचबरोबर, अशा उमेदवारांकडून महिला सभापतीला राजकीय पाठबळही मिळण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. त्यामुळे या गणांतून उमेदवारी मिळविण्यासाठी इच्छुकांमध्ये चांगलीच चढाओढ दिसत आहे. महिला कार्यकर्त्यांची कमतरता आणि ‘घरच्या’ उमेदवारांचा प्रयोग
तालुक्यातील सहा गणांपैकी झाडगाव, वाढोणा बाजार आणि जळका हे तीन गण महिलांकरिता राखीव निघाले आहेत. मात्र, बहुतांश पक्षांमध्ये सक्रिय महिला कार्यकर्त्यांची कमतरता असल्याने, यावेळीही नेत्यांच्या पत्नी, सून, मुली किंवा विश्वासू कार्यकर्त्यांच्या कुटुंबातील महिलांना उमेदवारी मिळण्याची शक्यता आहे.
झाडगाव गण ओबीसी महिला तर वाढोणा बाजार गण सर्वसाधारण महिला प्रवर्गासाठी राखीव असल्याने, या भागात विविध पक्षांचे कार्यकर्ते मोठ्या प्रमाणात सक्रिय आहेत. त्यामुळे त्यांच्या घरातील महिलांनाच राजकीय मैदानात उतरण्याची शक्यता अधिक मानली जात आहे.वरध गणात अनुसूचित जमातींसाठी आरक्षण दरम्यान, वरध हा एकमेव गण अनुसूचित जमाती प्रवर्गासाठी राखीव असल्याने, या गणासह शेजारच्या गणातील या प्रवर्गातील उमेदवार सुद्धा निवडणुकीत उतरण्याची शक्यता आहे.
राळेगाव तालुक्यातील पंचायत समिती निवडणुकीत यंदा आरक्षणाचे समीकरण बदलल्याने राजकीय रंगत वाढली आहे. सर्व पक्षांसाठी उमेदवारी निवडणे आणि योग्य तोलामोलाचा उमेदवार देणे ही खऱ्या अर्थाने कसोटी ठरणार आहे.
