
सहसंपादक ::रामभाऊ भोयर
राळेगाव – इंदिरा गांधी कला महाविद्यालय, राळेगाव येथे राष्ट्रीय सेवा योजना (NSS) व रेड रिबन क्लब यांच्या संयुक्त विद्यमाने आंतरराष्ट्रीय एड्स दिनानिमित्त भव्य जनजागृती कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. आजच्या आधुनिक युगात एच.आय.व्ही./एड्सविषयीचे गैरसमज व भीती दूर करून समाजामध्ये वैज्ञानिक दृष्टीकोन आणि संवेदनशीलता निर्माण करण्यासाठी या कार्यक्रमाचे विशेष महत्त्व असल्याचे आयोजकांच्या वतीने सांगण्यात आले.
या कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून डॉ. ए. वाय. शेख, प्रभारी प्राचार्य उपस्थित होते. आपल्या अध्यक्षीय मार्गदर्शनातून त्यांनी विद्यार्थ्यांनी समाजाच्या आरोग्यविषयक प्रश्नांबद्दल जागृत राहून जबाबदार नागरिक म्हणून योगदान देणे आवश्यक असल्याचे सांगितले. “एच.आय.व्ही.बाधित व्यक्तींना सहानुभूती, समज व सन्मानाने वागवणे ही खरी मानवता आहे. भीती व अज्ञानामुळे निर्माण झालेला सामाजिक भेदभाव दूर करणे ही आजची तातडीची गरज आहे,” असेही त्यांनी स्पष्ट केले.
कार्यक्रमाच्या प्रमुख वक्त्या डॉ. वर्षा बडणाखे, समुपदेशक, ग्रामीण रुग्णालय, राळेगाव यांनी विद्यार्थ्यांशी संवाद साधताना एच.आय.व्ही. संक्रमणाची कारणे, प्रतिबंधक उपाय, चाचण्या, औषधोपचारातील प्रगती आणि सरकारी योजनेद्वारे उपलब्ध सुविधा याची सविस्तर माहिती दिली. त्यांनी सांगितले की एच.आय.व्ही. संक्रमित व्यक्ती योग्य वेळी उपचार घेतल्यास पूर्णपणे निरोगी व सामान्य जीवन जगू शकतात, त्यामुळे कोणालाही एड्सबाधित व्यक्तींना दूर ठेवण्याचा किंवा तिरस्कार करण्याचा अधिकार नाही. समाजाचा पाठिंबा आणि मानसिक बळ हे औषधाइतकेच महत्त्वाचे असल्याचे त्यांनी अधोरेखित केले.
यानंतर कार्यक्रमातील दुसरे प्रमुख वक्ते मा. श्री. श्रीकांत लाभसेटवार, प्रयोगशाळा तंत्रज्ञ, ग्रामीण रुग्णालय, राळेगाव यांनी विद्यार्थ्यांना एच.आय.व्ही./एड्स प्रतिबंध आणि संवेदनशीलतेची शपथ देऊन सामाजिक उत्तरदायित्व स्वीकारण्याचे आवाहन केले. त्यांनी सांगितले की प्रत्येक तरुणाने एड्सविषयी योग्य माहिती समाजापर्यंत पोहोचवून गैरसमजांना आळा घालण्यासाठी पुढाकार घेणे आवश्यक आहे.
कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी म्हणून स. प्राध्यापक डॉ. एस. डी. दावडा यांनी उपस्थित राहून विद्यार्थ्यांना प्रेरणादायी मार्गदर्शन केले. उच्च शिक्षणात अशा सामाजिक जाणीवपूर्वक उपक्रमांची आवश्यकता असल्याचे त्यांनी नमूद केले.कार्यक्रमाची प्रस्तावना रासेयो कार्यक्रम अधिकारी श्री. स्वप्नील गोरे यांनी करून कार्यक्रमाचे उद्दिष्ट, महत्त्व आणि आयोजनामागील हेतू स्पष्ट केले. त्यांनी सांगितले की NSS व रेड रिबन क्लब विद्यार्थ्यांमध्ये सामाजिक बांधिलकी व आरोग्याविषयी जागरूकता निर्माण करण्यासाठी विविध उपक्रम राबवत राहतील.
थोर वैचारिक आणि प्रेरणादायी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कु. पायल नांदुरकर हिने उत्तमरीत्या केले. तर आभार प्रदर्शन कु. भावना पराते हिने करून सर्व मान्यवर, तज्ञ वक्ते, प्राचार्य सर आणि उपस्थित विद्यार्थ्यांचे मनःपूर्वक आभार मानले.या कार्यक्रमास महाविद्यालयातील शिक्षकवृंद, विद्यार्थी आणि NSS स्वयंसेवक मोठ्या संख्येने उपस्थित होते. उपस्थितांनी कार्यक्रमाचे मनापासून कौतुक केले आणि एड्सविषयी जागरूकता निर्माण करण्यासाठी कार्यरत राहण्याची तयारी दर्शविली.
