
सहसंपादक : रामभाऊ भोयर
यवतमाळ :- विदर्भातील पांढरकवडा परिसरात पर्यावरण संरक्षणाचा एक आदर्श प्रकल्प साकारला असून, त्याची चर्चा आता जिल्ह्याबाहेरही होत आहे. नागेझरी येथील आदिवासी समाजातील शिक्षक भाऊराव मरापे यांच्या पुढाकारातून तब्बल ४०० एकर उजाड भूमीवर ‘जंगोदाई ऑक्सिजन पार्क’ उभे राहिले आहे.
काही वर्षांपूर्वी या भागातील जंगल क्षेत्र मोठ्या प्रमाणात नष्ट होत होते. याचा थेट परिणाम तापमान वाढ, पाणीटंचाई आणि जैवविविधतेवर होत होता. ही स्थिती पाहून भाऊराव मरापे यांनी २०१८–१९ मध्ये जंगल पुनरुज्जीवनाचा निर्णय घेतला. सुरुवातीला अनेक अडचणी आल्या; मात्र त्यांनी हार न मानता CSR, लोकवर्गणी आणि स्थानिक नागरिकांच्या सहकार्याने काम सुरू केले.
या उपक्रमाअंतर्गत विविध देशी वृक्षांची लागवड, पाणी साठवण व्यवस्था, माती धूप रोखण्यासाठी उपाययोजना करण्यात आल्या. यामुळे परिसरात पक्षी, प्राणी आणि वनस्पतींची संख्या वाढली असून पर्यावरणीय समतोल पुन्हा प्रस्थापित होत आहे.
आज ‘जंगोदाई’ हे ठिकाण ऑक्सिजन पार्कसह आदिवासी संस्कृतीचे दर्शन घडवणारे केंद्र बनले आहे. येथे पर्यावरण जनजागृती कार्यक्रम, विद्यार्थ्यांसाठी अभ्यासभेटी तसेच सांस्कृतिक उपक्रम आयोजित केले जातात. नागरिक मोठ्या संख्येने शुद्ध हवेसाठी येथे भेट देत आहेत.
विशेष म्हणजे या संपूर्ण प्रकल्पातून भाऊराव मरापे यांनी कोणताही आर्थिक लाभ घेतलेला नाही. निस्वार्थ भावनेतून सुरू असलेला हा उपक्रम पुढील पिढ्यांसाठी प्रेरणादायी ठरत असून, शासनाने याला अधिक संरक्षण व पाठबळ द्यावे, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.
