
(प्रतिनिधी) शेख रमजान
आपल्या कर्तव्यासोबतच सामाजिक बांधिलकी जपणारे, प्रबोधनकार, गायक आणि लेखक अशी बहुआयामी ओळख असलेले बिटरगाव बिटचे जमादार गजानन कनाके यांना पोलीस प्रशासनातील त्यांच्या प्रदीर्घ आणि प्रामाणिक सेवेचे फळ मिळाले आहे. त्यांची पोलीस उपनिरीक्षक (PSI) पदी बढती झाल्याने यवतमाळ जिल्ह्यात आनंदाचे वातावरण आहे.
समाजसेवेचा वारसा आणि ‘कोरोना’ काळातील योगदान
गजानन कनाके साहेब हे केवळ एक पोलीस अधिकारी नसून एक उत्तम प्रबोधनकार देखील आहेत. कोरोनाच्या भीषण संकटात त्यांनी ‘कोरोना को भगाना है’ या गीताची निर्मिती करून युट्यूबच्या माध्यमातून जनजागृतीचे मोठे कार्य केले. केवळ प्रबोधनच नव्हे, तर आदिवासी एकता महिला आघाडीच्या जिल्हाध्यक्षा सौ. रेखाताई कनाके यांच्या हस्ते गरजू कुटुंबांना जीवनावश्यक वस्तूंच्या किटचे वाटप करून त्यांनी माणुसकीचे दर्शन घडवले. क्रांतीवीर बिरसा मुंडा आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त देखील ते सामाजिक उपक्रम राबवत असतात.
प्रदीर्घ सेवाप्रवास
१९९४ मध्ये पुसद तालुक्यातील खंडाळा येथून त्यांनी आपल्या पोलीस सेवेला सुरुवात केली. त्यानंतर पुसद येथील DySP कार्यालयात ‘नाईक’ म्हणून त्यांनी आपल्या कामाची छाप पाडली. पुढे पदोन्नती मिळाल्यावर त्यांनी यवतमाळ येथे ट्रॅफिक जमादार म्हणून चोख कामगिरी बजावली. सध्या बिटरगाव-ढाणकी येथे बिट जमादार म्हणून कार्यरत असताना त्यांना सेवा ज्येष्ठतेनुसार पोलीस उपनिरीक्षक पदी पदोन्नती मिळाली आहे.
जरी २०१३ ची परीक्षा उत्तीर्ण होऊनही पदोन्नती मिळण्यास विलंब झाला असला, तरी त्यांनी कधीही आपल्या कर्तव्यात कसर सोडली नाही. त्यांच्या या निष्ठेचे फळ आज त्यांना मिळाले आहे. त्यांच्या या यशाबद्दल सर्व स्तरांतून त्यांचे कौतुक आणि अभिनंदन होत आहे.
