

यवतमाळ जिल्हा प्रतिनिधी रामभाऊ भोयर
चंद्रपूर आणि यवतमाळ जिल्ह्याच्या सीमेवर पोलिसांनी थरारक पाठलाग करून गोवंशाची अवैध वाहतूक करणारा कंटेनर पकडला आहे. वडकी पोलिसांनी खैरी शिवारात नाकाबंदी करून केलेल्या या कारवाईत ५८ गोवंश आणि एक कंटेनर असा एकूण ४१ लाख ६० हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. याप्रकरणी नागपूर येथील तीन आरोपींना अटक करण्यात आली असून त्यांच्यावर विविध कायद्यांन्वये गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.७ मे रोजी सायंकाळी ४:४५ वाजताच्या सुमारास चंद्रपूर जिल्ह्यातील माजरी पोलीस स्टेशन आणि यवतमाळ नियंत्रण कक्षाकडूनवडकी पोलिसांना माहिती मिळाली. एक कंटेनर (क्र. HR-69-C-9634) माजरी, वणी मार्गे गोवंश घेऊन वेगाने पळत असून, पोलीस आणि गोरक्षक त्याचा पाठलाग करत होते. माहिती मिळताच वडकी पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक सुखदेव भोरकडे यांनी पथकासह खेरी शिवारात धाव घेतली. पोलिसांनी एका अरुंद पुलावर ट्रक आडवा लावून रस्ता अडवला. सायंकाळी ५:१५ च्या सुमाराससंशयास्पद कंटेनर येताच पोलिसांनी त्याला घेराव घातला आणि चालकासह तिघांना ताब्यात घेतले. कंटेनरची तपासणी केली असता, त्यात ५८ गोवंश क्रूरपणे कोंडलेले आढळले. पोलिसांनी ११ लाख ६० हजार रुपये किमतीचे गोवंश आणि ३० लाख रुपयांचा कंटेनर जप्त केला आहे. याप्रकरणी झनकलाल मरकाम, मंजूरखान पठाण आणि अब्दुल सोहेब (सर्व रा. नागपूर) यांना अटक करण्यात आली आहे. जप्त केलेले गोवंश सुरक्षितपणे गोशाळेत हलवण्यात आले आहेत. ही कारवाई पोलीस अधीक्षक कुमार चिंता, अपर पोलीस अधीक्षक अशोक थोरात आणि सहाय्यक पोलीस अधीक्षक रॉबिन बन्सल यांच्या मार्गदर्शनाखाली वडकी पोलिसांनी यशस्वीरीत्या पार पाडली.
