
यवतमाळ जिल्हा प्रतिनिधी रामभाऊ भोयर
क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिबा फुले व राष्ट्रनिर्माते डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त दरवर्षीप्रमाणे यंदाही समता पर्व प्रतिष्ठान, यवतमाळ यांच्या वतीने विविध सामाजिक, शैक्षणिक व सांस्कृतिक कार्यक्रमांचे भव्य आयोजन करण्यात आले आहे. गेल्या २२ वर्षांपासून सुरू असलेल्या या समता पर्वात प्रबोधनपर व्याख्याने, सांस्कृतिक लोकधारा, महानाट्य, “यवतमाळ आयडल”, अभिनय स्पर्धा आदी उपक्रमांचा समावेश असून देश-विदेशातील अनेक मान्यवरांची उपस्थिती या कार्यक्रमांना लाभत असते.समता पर्वाची स्थापना महाराष्ट्र राज्याच्या सामाजिक न्याय विभागाचे प्रधान सचिव मा. डॉ. हर्षदीप कांबळे यांच्या प्रेरणेतून करण्यात आली आहे. यावर्षी ७ एप्रिल ते १४ एप्रिल २०२६ या कालावधीत “समता पर्व २०२६” चे आयोजन करण्यात आले आहे.
या निमित्ताने दिनांक १३ एप्रिल २०२६ रोजी सायंकाळी ७.०० वाजता समता पर्व प्रतिष्ठानच्या वतीने दिला जाणारा प्रतिष्ठेचा “डॉ. बाबासाहेब आंबेडकर पत्रकारिता पुरस्कार २०२६” दैनिक पब्लिक पोस्टचे राळेगाव तालुका प्रतिनिधी मनोहर बोभाटे यांना जाहीर करण्यात आला आहे.हा पुरस्कार हरियाणाचे माजी मंत्री तथा खासदार मा. राजकुमार सैनी यांच्या हस्ते प्रदान करण्यात येणार असून, या समारंभासाठी मनोहर बोभाटे यांना सहपरिवार उपस्थित राहण्याचे निमंत्रण समता पर्व प्रतिष्ठान, यवतमाळ यांच्या वतीने देण्यात आले आहे.पत्रकारिता क्षेत्रात समाजाभिमुख कार्य करताना सामाजिक परिवर्तनासाठी दिलेल्या योगदानाची दखल घेत हा पुरस्कार जाहीर करण्यात आला असून, यामुळे मनोहर बोभाटे यांच्या कार्याला अधिक प्रेरणा मिळेल, असा विश्वास समता पर्व प्रतिष्ठानच्या वतीने व्यक्त करण्यात आला आहे.
