
(प्रतिनिधी) शेख रमजान
उमरखेड तालुक्यातील ढाणकी मंडळात होणाऱ्या गौण खनिजाच्या अवैध उत्खनन आणि वाहतुकीला आळा घालण्यासाठी तहसीलदार आर. यु. सुरडकर यांनी दि. ३० मार्च २०२६ रोजी विशेष भरारी पथकाची स्थापना केली होती. मात्र, प्रशासनाचे हे आदेश केवळ कागदावरच राहिल्याचे चित्र असून, प्रत्यक्ष मैदानावर नियुक्त अधिकारी आणि कर्मचारी कारवाई करताना दिसत नसल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे.
प्रशासनाने नियुक्त केलेले पथक आणि जबाबदारी
तहसीलदारांच्या आदेशानुसार, ढाणकी मंडळासाठी मंडल अधिकारी एस. एम. वाघमारे यांच्या नियंत्रणाखाली आठवड्यातील सातही दिवस स्वतंत्र पथके नेमण्यात आली आहेत.
यामध्ये खालील महसूल अधिकाऱ्यांचा समावेश आहे:
सोमवार: एस. एस. जगताप (ग्राम महसूल अधिकारी) व अभिलाष गायकवाड.
मंगळवार/रविवार: आर. ए. भंडारे (ग्राम महसूल अधिकारी) व सय्यद इबादुल्ला सय्यद उमर.
बुधवार: ए. आर. शिंदे (ग्राम महसूल अधिकारी) व आनंदराव जी. पेठणकर.
गुरुवार: के. जी. इंगळे (ग्राम महसूल अधिकारी) व भारत मारोती सूर्यवंशी.
शुक्रवार: बी. बी. पावडे (ग्राम महसूल अधिकारी) व चक्रधर साहेबराव काळे.
शनिवार: राहुल भोजने (ग्राम महसूल अधिकारी) व अभिलाष गायकवाड.
तहसीलदारांच्या आदेशात स्पष्ट नमूद करण्यात आले होते की, या पथकाने दररोज नियुक्त केलेल्या दिवशी हजर राहून अवैध उत्खनन व वाहतूक करणाऱ्या वाहनांवर दंडात्मक कारवाईचा प्रस्ताव कार्यालयात सादर करावा. कामात हलगर्जीपणा केल्यास नियमानुसार कारवाईचा इशाराही देण्यात आला होता.
मात्र, इतकी मोठी यंत्रणा तैनात असतानाही ढाणकी परिसरातून अवैध रेतीची वाहतूक सर्रास सुरू आहे. मंडल अधिकारी वाघमारे यांच्या नियंत्रणाखालील हे पथक नेमके कुठे आहे? असा प्रश्न स्थानिक नागरिकांकडून उपस्थित केला जात आहे. एकही प्रभावी कारवाई होत नसल्याने या पथकाच्या कार्यक्षमतेवर मोठे प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
चौकट:
कारवाई होणार का?
जिल्हाधिकारी यवतमाळ आणि उपविभागीय अधिकारी उमरखेड यांनाही या आदेशाची प्रत माहितीसाठी सादर करण्यात आली आहे. अशा परिस्थितीत, वरिष्ठांच्या आदेशाला केराची टोपली दाखवणाऱ्या या पथकातील कर्मचाऱ्यांवर तहसीलदार आर. यु. सुरडकर आता काय कारवाई करतात, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
